Nagpur Crime : पिण्यास पाणी मागितले, मग हातात धागा बांधला, पुढे जे घडले त्याने नागपूर हादरले !
नागपूरमध्ये लूटीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांना एकटे गाठून लुटण्याचे प्रकार होत आहेत. लुटण्यासाठी चोरटे जे फंडे वापरत आहेत, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
नागपूर / 28 ऑगस्ट 2023 : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची आता क्राईम सिटी अशी ओळख बनत चालली आहे. जेष्ठ नागरिक, घरात एकट्या महिलांना गाठून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी एक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला लुटल्याची घटना घडली आहे. पालखीसाठी पैसे मागत त्यांना धागा दिला आणि महिलांना बेशुद्ध करून त्यांचं मंगळसूत्र घेऊन पळ काढला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही चोरट्यांचा पोलिसांनी काही तासातच शोध घेतला. मात्र यांनी त्या धाग्याला कुठला द्रव लावला होता, त्यामुळे या महिला बेहोश झाल्या याचा शोध पोलीस घेत आहे.
काय घडलं नेमकं?
नागपूरच्या यशोधरा नगर परिसरातील धम्मदीप नगरमध्ये सासू आणि सून आपल्या घरी बसल्या होत्या. यावेळी तिथे तीन जन हातात झेंडा घेऊन आले. पालखीला जात आहोत, काही दान करा अशी विनवणी त्यांनी केली. म्हणून सूनबाईने त्यांना दहा रुपये दिले. मग त्यांनी प्यायला पाणी मागितलं. महिलेने त्यांना पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी दोघींच्या हातात एक धागा बांधला. धागा बांधल्यानंतर थोड्याच वेळात दोघीही बेशुद्ध झाल्या.
मुलगा घरी आल्यानंतर सर्व प्रकार उघड
सासू-सून बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत पळ काढला. महिलेचा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा आई आणि पत्नी दोघीही बेशुद्ध पडलेल्या दिसल्या. त्याने त्यांच्या तोंडावर पाणी झिडकत उठवलं. यानंतर त्यांनी सर्व घडला प्रकार कथन केला. मुलाने लगेच पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर माहिती घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. अखेर कळमेश्वर येथून तिन्ही आरोपींना अटक केली.