Nagpur Crime : असा मुलगा नकोच ! क्षुल्लक कारणावरून लेकाने जन्मदात्रीसोबत केलं असं काही…
ज्या आईने नऊ महीने भार सोसून जन्म दिला, आयुष्यभर कष्ट करून वाढवलं. त्याच आईसोबत पोटच्या लेकाने जे काही केलं ते वाचून तुम्ही देखील हादराल.
सुनील ढगे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 21 ऑक्टोबर 2023 : आई आणि मुलांचं नात सगळ्यात वेगळं आणि प्रेमही खास. आई फक्त बाळाला नऊ महिने पोटात वाढवत नाही तर जन्म दिल्यानंतरही ती त्याचं पालनपोषण करते. त्याला सगळी सुखं मिळावीत यासाठी सतत कष्ट तर करतेच पण त्याचसोबत आपलं मूल एक चांगला माणूस, व्यक्ती म्हणून घडावा यासाठीही डोळसपणे वागून मेहनत करते. त्यांना चांगले संस्कार देते. मात्र काही वेळा मुलं आईचे कष्ट विसरतात आणि स्वत:च्या फायद्यासाठी स्वार्थी बनतात.
अशाच एका मुलाने स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याच जन्मदात्रीसोबत जे केलं ते वाचून तुम्ही देखील हादराल. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मुलाने स्वतःच्याचं आईचा गळा दाबून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून हत्या केली. १८ ऑक्टोबर, म्हणजे दोन दिवसांपूर्वी हा दुर्दैवी प्रकार घडला. शवविच्छेदन अहवालात महिलेची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे.
नेमकं काय झालं ?
याप्रकरणी दीपक गुलाबराव बडबाईक यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. दीपक यांची आई, कमलाबाई गुलाबराव बडबाईक या फिर्यादीचा मोठा भाऊ रामनाथ यांच्यासोबत राहत होत्या. मात्र १८ ऑक्टोबर रोजी फिर्यादी, दीपक यांना त्यांच्या आईची तब्येत खराब असल्याचा निरोप एका मित्राने दिला. रामनाथ हा त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्याचे त्यांना समजलं. मात्र अवघ्या काही वेळातच त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची खबर मिळाली.
दु:खावेग आवरून दीपक याने घरी धाव घेतली. तेव्हा आईच्या गळयावर जखमा दिसून आल्या. तसेच डाव्या हाताच्या अंगठयाला शाई लागल्याचे दिसले. तसेच त्यांच्याकडचे दागिनेही दिसत नव्हते. हे सर्व पाहून दीपकने , त्यांच्या मोठ्या भावाकडे रामनाथ याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याने काहीच उत्तर न दिल्याने फिर्यादी दीपक यांना संशय आला. भावाच्या वागणुकीवर संशय आल्याने दीपकने हुडकेश्वर पोलीस तक्रार दाखल केली.
त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह मेडीकल हॉस्पीटलला पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला होता. गळा दाबल्यामुळेच दीपक यांच्या आईचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी रामनाथ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली. मृतक कमलाबाई व आरोपी रामनाथमध्ये यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने आईला गळा दाबुन जिवानीशी ठार केले अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.