नितिन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकी प्रकरणी, आरोपी नागपूर पोलिसांच्या ताब्यात
नितिन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासाअंती प्रकरणाचा खुलासा झाला.
नागपूर / गजानन उमाटे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी जयेश पुजाराला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जयेश पुजारा याला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणण्यात आलंय. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन नागपूर पोलिसांनी जयेश पुजाराला ताब्यात घेतलं. जयेश पुजारा याने दोन वेळा गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात फोन केला आणि खंडणी मागितली होती. आता नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणात आरोपी जयेश पुजारा याची सखोल चौकशी करत आहेत. आज सकाळी जयेश पुजारा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं मेडिकल करण्यात आलं.
गडकरी यांच्या ऑफिसमध्ये फोन करुन 10 कोटींची खंडणी मागितली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 21 मार्च रोजी सकाळी धमकीचे दोन फोन आले होते. फोनवर 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. जयेश पुजारी याच्या नावाने हे धमकीचे फोन आले होते. यानंतर गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलिसांना याची माहिती दिली. त्याआधी 14 जानेवारीला बेळगाव तुरुंगातून जयेश पुजारीच्या नावाने कॉल आले होते.
जयेश पुजारा याने हे कॉल केल्याचे तपासात उघड
बेळगाव मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार जयेश पुजारा यानेच हे धमकीचे फोन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. धक्कादायक म्हणजे जयेश पुजारा याने दुसऱ्यांदा कारागृहातूनच हे फोन केल्याचे उघड झाले. या प्रकरणात एका महिलेचेही नाव पुढं येत आहे. मात्र महिलेला ताब्यात घेण्यात आले नाही.
नागपूर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत सिमकार्ड, मोबाईल केले जप्त
नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात सरप्राइज सर्च ऑपरेशन राबवलंय. यावेळी जयेश पुजाराकडून दोन मोबाईल आणि दोन सिम कार्ड जप्त करण्यात आले. या आरोपीने याआधीही गडकरी यांनी धमकीचे कॉल केले होते. त्यावेळी तपासात आरोपीकडे काहीही आढळलं नव्हतं. मात्र, दुसऱ्या वेळी पोलिसांना जुने सिमकार्ड सुद्धा आढळले. हे मोबाईल, सिमकार्ड या आरोपीकडे जेलमधे कसे आले? यात आणखी सह आरोपींचा समावेश आहे का? या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत.