कुंपणानंच शेत खाल्लं की हो… नांदेडमध्ये एसीबीच्या जाळ्यात त्यांच्याच खात्याच्या पीआय! राज्यात चर्चा!
एसीबीने स्वतःच्या पोलीस निरीक्षकाला देखील लाच घेण्याच्या सापळ्यात अटक केल्याने या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
नांदेडः ज्यांनी लाचखोरांच्या मुसक्या आवळायच्या, त्यांनीच लोभापायी लाचखोरी (Bribe) करून हात काळे केल्यास, सामान्यांनी कुणाकडे पाहयचं? असा सवाल उपस्थित केला जातोय. नांदेडमध्ये (Nanded) उघडकीस आलेल्या लाचखोरीची चर्चा राज्यात होतेय. कारणही तसंच आहे. ज्यांनी भ्रष्टाचाराला (Curruption) आळा घालायचा, त्याच विभागातील पोलीस निरीक्षक यांनी लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. सध्या या महिला पोलीस निरीक्षकाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
महिला पोलीस निरीक्षक असलेल्या मीरा बकाल ह्या 2012 साली पोलीस खात्यात रुजू झाल्या होत्या, गत वर्षभरापासून त्या नांदेडच्या एसीबीच्या युनिट मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
नांदेडमध्ये एका सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचे उघड झाले आहे. पती आणि आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिने ही लाच स्वीकारली. लाच देण्यापूर्वीच सेतू सुविधा केंद्र चालकाने एसीबीकडे या महिला पोलीस निरीक्षकांची तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून एसीबीने तपास करत महिला पोलीस निरीक्षक मीरा बकाल, तिचा नवरा आणि त्यांचे कौटुंबिक दोन मित्र असे एकूण चौघांना अटक केलीआहे.
या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसीबीने स्वतःच्या पोलीस निरीक्षकाला देखील लाच घेण्याच्या सापळ्यात अटक केल्याने या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा होत आहे.