रक्ताच्या नात्याला गालबोट, मोठ्या भावाकडून धाकट्याची चाकूने वार करत हत्या
जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरमध्ये मोठ्या भावाने छोट्या भावाची चाकूने वार करुन हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव भागात रक्ताच्या नात्याला गालबोट लावणारी ही घटना घडली. घराजवळ रस्त्यावर अडवत भावानेच छोट्या भावावर चाकूने वार केले होते. (Nanded elder brother kills younger one over old dispute)
जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत मोठ्या भावाने छोट्या भावाची चाकूने वार करुन हत्या केली. या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जी. जी. रांजनकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनीही भेट दिली व पुढील तपासाबाबात सूचना केल्या.
नेमकं काय घडलं?
मंगळावर 6 जुलै रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील दिगंबर अमृतर कल्याणकर (वय 48 वर्ष) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत छोटा भाऊ अनिल दिगंबर कल्याणकर (वय 45 वर्ष) याला घराजवळील रस्त्यावर अडवले. मागच्या भांडणावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दिगंबरने भावावर चाकूचे वार केले. यामध्ये जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला भाऊ अनिल कल्याणकर हा जागीच ठार झाला.
पुतण्याच्या तक्रारीवरुन काकावर गुन्हा
यावेळी घटनास्थळी अर्धापूर पोलिसांनी रात्रीच भेट दिली आणि आरोपीला ताब्यात घेतले. मयत अनिल कल्याणकर यांचा मुलगा अमोल अनिल कल्याणकर याच्या फिर्यादीवरून दिगंबर कल्याणकर यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करत आहेत.
संबंधित बातम्या :
जुन्या भांडणाचा राग, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या, पाच आरोपींना काही तासातच अटक
बांधाच्या वादातून पुण्यात वृद्धाची हत्या, दगडाने ठेचून नातेवाईकानेच प्राण घेतले
(Nanded elder brother kills younger one over old dispute)