Nanded Murder : स्वतंत्र मराठवाडा वर्तमानपत्राच्या संपादकांची भर रस्त्यात धारदार शस्त्रानं वार करत हत्या
घराजवळ राहणारा कृष्णा हातांगळे हा त्यांच्या समोर आला आणि त्याने जोंधळे यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले.

नांदेड : नांदेड (Nanded Murder News) शहरातील स्वतंत्र मराठवाडा या वर्तमानपत्राच्या संपादकांची (News Paper Editor) भर रस्त्यावरच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोमेश कॉलनी भागात राहणारे प्रेमानंद जोंधळे (Premanand Jondhale) हे आपल्या घरातून बाहेर निघून मिलरोडवर चालत जात होते. त्यावेळी घराजवळ राहणारा कृष्णा हातांगळे हा त्यांच्या समोर आला आणि त्याने जोंधळे यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. जवळपास 7 ते 8 सपासप वार धारधार शस्त्रानं जोंधळे यांच्यावर करण्यात आले. या हल्ल्यात प्रेमानंद यांचा मृत्यू झालाय. जुन्या वादातून चाकूने सपासप वार करून ही हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येच्या घटनेनंतर आरोपी पळून गेला. शनिवारी रात्री भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेतायत. या घटनेनं संपूर्ण नांदेड शहर हादरुन गेलंय.
24 तासात दोन हत्या, नांदेडमध्ये चाललंय काय?
नांदेडमध्ये अवघ्या चोवीस तासांच्या आत दोन हत्येच्या घडना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. संपादकांच्या हत्येच्या घटनेआधी एका तरुणाचीही हत्या करण्यात आली होती. अमोल साबणे या तरुणाचीही धारदार शस्त्रानंच वार करत हत्या करण्यात आली होती.
अमोल रात्री घरी न परतल्यामुळे त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान, अमोलच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्रांना अमोलचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडालेली. अज्ञातांनी अमोलवरही धारदार शस्ज्ञानं वार करत त्याची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय.
अमोलच्या हत्येची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये घडलेल्या आणखी एका हत्येमुळे पोलिसांसमोरचीही आव्हानं आता वाढली आहेत. इतवारा पोलीस ठाणे आणि वाजीराबाद पोलिसांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अधिक तपास आता केला जातो आहे.
5 एप्रिलला बियणींच्या हत्येनंही हादरलेलं नांदेड
नांदेड शहरात 05 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वीच बियाणी यांच्यावर खंडणी मागण्यासाठी पिस्तूल रोखण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. त्यानंतर 05 एप्रिल रोजी नांदेडमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली. त्यानंतर पंधरा दिवसून उलटून गेल्यानंतरही पोलिसांना अद्याप महत्त्वाचा क्लू हाती लागलेला नाही किंवा मारेकऱ्याचा शोधही लागलेला नाही. या घटनेनंतरही नांदेडमध्ये हत्या होण्याचं प्रमाणही लक्षणीय असल्याचं अनेक घटनांमधून अधोरेखित झालंय.