रक्ताने माखलेला लालबुंद दगड सारे काही सांगतो; नाशिकमध्ये माजी कुलसचिवांचे खुनानंतरही हालहाल
संशयित राहुल जगतापने बाप-लेकाचा खून केल्यानंतर त्यांच्या घराच्या चाव्या गोदावरी नदीत टाकल्या. टाकळी गावाजवळील मलशुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागील पुलावरून त्याने या चाव्या नदीत फेकल्या. या ठिकाणी पोलिसांनी संशयिताला नेत घटनास्थळावर दोनेक तास तपासणी केली. मात्र, त्यांना चाव्या सापडल्या नाहीत.
नाशिकः नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे निवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांचा खून (Murder) केल्यानंतर संशयिताने मृत्यूनंतरही त्यांचे हालहाल केल्याचे उघड झाले आहे. त्याने नानासाहेबांच्या मृतदेहावर फेकलेला आणि रक्ताने माखल्याने लालबुंद झालेला दगड पोलिसांना (Police) मोखाडा घाटाच्या दरीत सापडलाय. यावरूनच हत्याकांडात क्रौर्याची किती परिसीमा गाठली गेली, हे समोर येतेय. त्यामुळे तपास करणारे पोलिसही हादरून गेलेत. याप्रकरणाचा मुख्य संशयित असणारा हॉटेल व्यावसायिक राहुल जगताप याने संपत्तीच्या हव्यासापोटी नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांचा अतिशय निर्घृण खून केल्याचे समोर येत आहे.
कसा केला खून?
नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र डॉक्टर अमित कापडणीस रहायचे. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली. त्याच्यासाठी आपण तुमच्या आईचे विद्यार्थी असल्याचे सांगितले. डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्यांचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकला.
का केला खून?
कापडणीस कुटुंबाची नाशिकमध्ये प्रचंड जायदाद आहे. ही संपत्ती पाहून राहुलचे डोळे दीपावले. त्यातूनच त्याने कापडणीस पिता-पुत्राच्या खुनाचा कट रचला. कापडणीस यांचे पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच नाशिकला राहायचे. त्यांची पत्नी व मुलगी मुंबईला राहायच्या. याचाच फायदा संशयिताने उठवला. त्यांचा खून करून यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकत पैसे काढले. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या.
मृत्यूनंतर कसे हाल?
माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह संशयिताने मोखाडा घाटातल्या दरीत फेकला. मात्र, तो मृतदेह एका झाडावर जावून अडकला. हे कोणालाही दिसू शकते. खुनाला वाचा फुटू शकते. हे लक्षात घेत आरोपीने झाडावर अडकलेल्या मृतदेहावरही दगडांचा वर्षाव केला. त्यातला एक मोठा दगड मृतदेहावर पडला. त्यामुळे झाडावर अडकलेला मृतदेह दगडासह दरीत कोसळला. हा दगड शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. रक्ताने लालबुंद झालेला दगड पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय.
घराच्या चाव्या गोदावरीत
संशयित राहुल जगतापने बाप-लेकाचा खून केल्यानंतर त्यांच्या घराच्या चाव्या गोदावरी नदीत टाकल्या. टाकळी गावाजवळील मलशुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागील पुलावरून त्याने या चाव्या नदीत फेकल्या. या ठिकाणी पोलिसांनी संशयिताला नेत घटनास्थळावर दोनेक तास तपासणी केली. मात्र, त्यांना चाव्या सापडल्या नाहीत. दुसरीकडे राहुल जगतापने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी सिनेअभिनेता जॉन अब्राहमची कार वापरल्याचे म्हटले आहे. ही रेंज रोव्हर कार त्याने गोवा येथून आणल्याचे तपासात समोर आलेय. त्यावर नाशिकचा बनावट नंबर लावला. राहुलने ही कार आपण मुंबईत एका एजंटकडून खेरदी केल्याचे म्हटले आहे. या कारच्या मालकाचा पोलिसांनी शोध सुरू केलाय.
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात