VIDEO | ‘पुष्पा’चा नाशिकमध्ये धुमाकूळ; शेतकऱ्यांना 60 लाखांचे लावले चंदन, प्रकरण काय?
अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित पुष्पा सिनेमात रक्त चंदनांने मालामाल झालेला अभिनेता पाहायला मिळाला. मात्र, येथे रक्त चंदनाच्या आमिषामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरूय. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सर्तक व्हावे. तुमच्या गावात असा पुष्पा आला तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
नाशिकः एकीकडे अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पाने (Pushpa) रसिकांना वेडे केले आहे. त्याचा झुकेगा नही, हा डायलॉग लहानसहान पोरांपासून ते राजकीय व्यासपीठावर मोठ्या कौतुकाने पेश केला जातोय. मात्र, दुसरीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात चक्क तामिळनाडूतून आल्याची बतावणी करून एका पुष्पारूपी भामट्यांच्या टोळीने शेतकऱ्यांचा डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. त्यांनी देवळा, चांदवड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 60 लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीला पकडा, आमचे पैसे मिळवून द्या, अशी आर्त विनवणी हे शेतकरी करताना दिसतायत. नेमके प्रकरण काय आहे, हे माहिती करून घेऊ. कारण असे कुठल्याही शेतकऱ्यांबाबत घडू शकते.
कशी केली फसवणूक?
सध्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग गाजताहेत. त्यात रक्त चंदनाच्या तस्करीची मिळणारे करोडो रुपयांचे गारुड सध्या अनेकांवर आहे. नेमकी हीच बाब हेरुन सात – आठ भामट्यांनी श्री लक्ष्मी गणपती नर्सरी नावाची कंपनी स्थापन केली. त्यात वरून आम्ही तामिळनाडूतून आल्याची बतावणी केली. या टोळीने देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यातील हद्दीवरील गिरणारे, कुंभारडे, झाडी, कोकणखेडे, उसवाड गावातील शेतकऱ्यांना रक्त चंदनाची लागवड करण्याचे आमिष दाखवले. रक्त चंदनाचे एक झाड लावण्यासाठी 200 रुपये भरा. त्या बदल्यात तुम्हाला 20 हजार रुपये अनुदान देऊ, अशी थाप मारली. या आमिषापोटी अनेकांनी लाखो रुपये या भामट्यांच्या हवाली केलेत.
म्हणे सरकारी योजना
भामट्यांनी रक्त चंदन लावण्याची ही सरकारी योजना असल्याचे भासवले. सरकारी अधिकारी येऊनच तुम्हाला अनुदान वाटप करतील, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी त्यास भुलले. त्यांनी काही शेतकऱ्यांना रोपेही आणून दिली. तुम्ही जास्त रोपे घेतली तर तुम्हाला तुम्हाला बोअरवेल मारून देऊ, तारेचे कुंपण करून, रक्त चंदनाच्या झाडाचे येणारे उत्पन्न खरेदी करू असे आमिष दाखवले.
अन् पोबारा केला
भामट्यांच्या आमिषाला भुलून अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. कोणी लाख, कोणी दोन लाख असे पैसे भरले. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. त्यांना संपर्क केला, तर त्यांचे फोनही लागत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्यांनी आता पोलिसांत धाव घेतली आहे. पुष्पा सिनेमात रक्त चंदनांने मालामाल झालेला अभिनेता पाहायला मिळाला. मात्र, येथे रक्त चंदनाच्या आमिषामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरूय. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सर्तक व्हावे. तुमच्या गावात असा पुष्पा आला तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!