नाशिकमध्ये ‘रौलेट’ने आवळला फास, जुगारासाठी चक्क 75 लाखांचे केले कर्ज, शेतकरी पुत्राचे टोकाचे पाऊल
रौलेट बिंगो हा ऑनलाईन जुगार आहे. या जुगारात अनेकजण पैसे गुंतवतात. निराश होतात. आणि पुन्हा टोकाचे पाऊल उचलतात. अंजनेरी येथे यापूर्वी या जुगारातून कर्जबाजारी झाल्यामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे.
नाशिकः नाशिकच्या (Nashik) ग्रामीण भागात रौलेट (Roulette) जुगाराने पाळेमुळे रुजवली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. अनेक जण देशोधडीला लागत आहेत. यापूर्वी या जुगारात कर्जबाजीरपण आल्यामुळे अनेकांनी आपली पत्नी आणि लहान-लहान मुले मागे सोडून या जगाचा निरोप घेतला. तसाच प्रकार आणखी एकदा घडला असून, याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी (farmer) पुत्रावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोरख त्र्यंबक गवळी असे या तरुणाचे नाव आहे. सध्या गोरखची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित सावकाराला अटक करावे, अशी मागणी कुटुंबांनी केली आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
गोरख त्र्यंबक गवळी. नाशिक जिल्ह्यातल्या अंजनेरी गावचा रहिवासी. पेशाने शेतकरी. मात्र, त्याला झटपट पैसे कमाविण्याची चटक लागली. त्यातूनच तो रौलेट जुगाच्या आमिषाला बळी पडला. सुरुवातीला काही काळ पैसे आलेही. मात्र, नंतर ताळमेळ जमला नाही. हा जुगार खेळण्यासाठी त्याने खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घेतले. ही रक्कम थेट 75 लाखापर्यंत गेली. सावकाराने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे शेवटी कंटाळून गोरखने आत्महत्येचा प्रयत्न केला.
कशी आहे साखळी?
रौलेट बिंगो हा ऑनलाईन जुगार आहे. या जुगारात अनेकजण पैसे गुंतवतात. निराश होतात. आणि पुन्हा टोकाचे पाऊल उचलतात. अंजनेरी येथे यापूर्वी या जुगारातून कर्जबाजारी झाल्यामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे. खासगी सावकार जुगाराच्या नादी लागलेले असे तरुण हेरतात. त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देतात. हे कर्ज वसुलीकरण्यासाठी पुन्हा जाच सुरू करतात. जमिनीवर जप्ती आणतात. त्यामुळे आपण आयुष्यात सारेच गमावले, या भावनेतून युवक नैराश्यग्रस्त होत आत्महत्या करतात. त्यामुळे या हा जुगार बंद करावा. खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी यापूर्वी रौलेट जुगाराचे कंबरडे मोडले होते. ही साखळी उद्धवस्त केली होती. त्यानंतर या जुगाराचे प्रमाण कमीही झाले होते. आता पुन्हा एकदा सचिन पाटील आक्रमक होतात का, ही साखळी मोडतात का, याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्याः