Nashik Crime | नाशिकमध्ये तलवारी घेऊन गुंडांचा रस्त्यावर हैदोस, वाहनांच्या काचा फोडून मारहाण
एकीकडे प्रचंड वेगाने वाढणारे पर्यटन, उद्योगनगरीने टाकलेली सुवर्णकात आणि दुसरीकडे तितक्याच वेगाने वाढणारी गुन्हेगारी. नाशिकची जी दुसऱ्या तऱ्हेने होणारी वाटचाल आहे, ती कोणाही सामान्यांच्या काळजात धडकी भरवणारीचय.
नाशिकः एकीकडे प्रचंड वेगाने वाढणारे पर्यटन, उद्योगनगरीने टाकलेली सुवर्णकात आणि दुसरीकडे तितक्याच वेगाने वाढणारी गुन्हेगारी (Crime). नाशिकची (Nashik) जी दुसऱ्या तऱ्हेने होणारी वाटचाल आहे, ती कोणाही सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरवणारीचय. यापूर्वी एकाच आठवड्यात पडलेले एकामागून एक खून असो, एकाच आठवड्यात पडलेले दरोडे असो की, आता सिडको परिसरामध्ये गुंडांनी घातलेला हैदोस. होय, हैदोसच. शुभम पार्क परिसरात एका टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावर नंगानाच तर केलाच, सोबतच तिथे उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. नाशिककरांमागे नेहमी हेल्मेटसक्तीचा लकडा लावणारे पोलीस आयुक्त ही गुंडगिरी कसे रोखणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
कशी घडली घटना?
नाशिकमधील शुभम पार्क परिसरात बधवारी रात्री नऊच्या सुमारास एक टोळके आले. त्यांच्या हातात तलवारी, चॉपर, कोयते होते. त्यांनी रस्त्यावर धुडगूस घालायला सुरुवात केली. हे पाहून परिसरातील नागरिक घाबरले. अनेकांनी तातडीने दुकाने बंद करायला सुरुवात केली. भाजपच्या माजी नगरसेविका छाया देवांग यांच्या मालकीच्या दुकानाचीही या टोळक्याने तोडफोड केली. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या सात ते आठ कारची तोडफोड केली. एका वाहनधारकाला वाहतून बाहेर काढून बेदम मारहाण केली.
वाईन शॉपसमोरच अड्डा
शुभम पार्क परिसरात एका माजी नगरसेवकाच्या मालकीचे वाईन शॉप आहे. येथे अनेक जण मद्य घेतात. आणि परिसरातच पीत बसतात. अनेक मद्यपी महिला आणि तरुणींची छेड काढतात. रस्त्यावरील येणा-जाणाऱ्यांनाही धमक्या देतात. त्यामुळे या भागातून हे वाईन शॉप हटवावे, अशी मागणी जोर धरते आहे. यापूर्वी एका शिष्टमंडळाने यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. आता तर सरकार गल्लोगल्ली वाईन विकायचे म्हणते आहे. तेव्हा काय होईल, असा सवालही विचारला जात आहे.
दोघांना बेड्या
सिडकोतल्या शुभम पार्क येथील हैदोसाबद्दल पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश गायकवाड (रा. शुभम पार्क) आणि सोनू खिरडकर (रा. स्वामी नगर, अंबड) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरा एका शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात जात भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नगरसेविका प्रतिभा पवार, माजी नगरसेविका छाया देवांग, निलेश ठाकरे, भूषण राणे, आबा पवार आणि ज्या वाहनांच्या काचा फोडल्या ता वाहनधारकांचा समावेश होता. नागरिकांनी यावेळी पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मोकाट गुंडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?