त्याला फक्त मोबाइल चोरीचा नाद, त्यातून मिळणाऱ्या पैशातून काय करायचा? कारण ऐकून पोलिसही चक्रावले…
नाशिक शहरात एका मोबाईल चोराला पकडण्यात आले होते, त्याच्याकडून भद्रकाली पोलिसांनी 12 मोबाइल जप्त केले असले तरी चोरी करण्याची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहे.
नाशिक : चोरी करण्यासाठी चोर कधी आणि कोणती शक्कल लढवेल याचा काही अंदाज नसतो. असाच काहीसा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस ( Nashik Crime News ) आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ( Bhadrakali Police ) केलेल्या एका कारवाईतून मोबाइल चोरीचा एक नवा फंडा समोर आला आहे. एक मोबाइल चोरून पळ काढत असतांना एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडून 12 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. जवळपास पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने इम्रान हनीफ पठाण याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 12 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून शीतळादेवी मंदिर येथे त्याला अटक करण्यात आली आहे.
अमरधाम परिसरातून मोबाईल चोरीकरून पळ काढत असतांना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याला फक्त मोबाईल चोरीचाच छंद असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
भानचंद लद्धड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मोबाइल चोर इम्रान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये मोबाईल चोरण्याची पद्धत ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहे.
इम्रान पठाण हा रिक्षा चालकांना लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. रिक्षामध्ये बसून प्रवास करत असतांना रिक्षा चालकासोबत गप्पा मारतो आणि त्यामध्ये विश्वास संपादन करून कॉल करायचा म्हणून मोबाइल घेतो.
कॉल करायचा बहाणा करतो आणि पसार होतो अशी साधी पद्धत तो मोबाइल चोरीसाठी वापरतो, त्यामुळे रिक्षा चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुणाला मदत करत असतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.