नाशिक : अंबड लिंक परिसरात हॉटेलचे नूतनीकरण एका गेस्टच्या जीवावर बेतले आहे. रूम पहायला गेलेल्या गेस्टचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
विनोद गीते असे मृत युवकाचे नाव आहे. अंबड लिंक रोडवरील एक्सलेन्स इन या हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील अंबड लिंक रोडवर एक्सलेन्स इन नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु आहे. नूतनीकरणासाठी हॉटेलमधील काही भाग तोडण्यात आला आहे. काही ठिकाणी खोदकामही करण्यात आले आहे. याच दरम्यान आज विनोद गिते नामक एक तरुण काही कामानिमित्त नाशिक येथे आला होता. विनोद एक्सलेन्स इन हॉटेलमध्ये राहण्यासाठी रुम उपलब्ध आहे का यासाठी विचारणा करण्यासाठी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर गेला होता. तिसऱ्या मजल्यावरचा कॉरिडोअरजवळचा काही भाग नूतनीकरणासाठी तोडण्यात आला होता. विनोद रुमच्या चौकशीसाठी रिसेप्शन टेबलकडे जात असतानाच लक्षात न आल्याने कॉरिडोअररील तोडलेल्या भागातून तोल जाऊन खाली पडला.
खाली सुद्धा नूतनीकरणासाठी खोदकाम सुरु होते. विनोद तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि खाली खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडांवर आपटला. दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा युवक तोडण्यात आलेल्या बांधकामात पडत असल्याचे दिसते. तर दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात खाली पडत असल्याचे दिसत आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. विनोद मूळचा कुठला आहे. तो नाशिकमध्ये कोणत्या कामासाठी आला होता. तसेच हॉटेलमध्ये नूतनीकरणाचे काम चालू असताना हॉटेल व्यवस्थापनाने पुरेशी सुरक्षेची काळजी घेतली नव्हती का याबाबत अधिक तपास सुरु आहे. (Guest dies after falling from third floor of hotel in hotel)
इतर बातम्या