जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने तरुणावर वार होत असल्याचं पाहून या तरुणाचा आत्तेभाऊ त्याच्या मदतीसाठी धावला होता. पण हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. तर त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी रात्रीच्या सुमारास रामेश्वार कॉलनीतील दोघा तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून तरुणावर हल्ला करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात नितीन निंबा राठोड, वय 24 आणि सचिन कैलास चव्हाण, वय 22 असे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यापैकी नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहेत. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता.
या वादाच्या कारणावरुन रविवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये काही तरुणांसोबत आला. त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरसारख्या शस्त्राने वार केले.
दरम्यान, नितीनवर हल्ला झाल्याचं पाहताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार करुन सचिनलाही जखमी केलं. यानंतर हल्लेखोर पसार झाले.
या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तरुणावर झालेल्या या जीवघेण्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून नेमकी काय दखल घेतली जाते, हे पाहणंही महत्त्वाचंय. किरकोळ कारणावरुन तरुणांवर झालेला जीवघेणा हल्ला कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करणारा आहे.