Nashik Murder | नाशकात बकरा व्यापाऱ्याचा निर्घृण खून, लाल ओढणीत गुंडाळलेले बारा लाख गायब!
बकरा खरेदी करण्यासाठी तसेच बकरा खरेदीनंतरची शेतकऱ्यांची रक्कम वाटपासाठी लाल रंगाच्या ओढणीमध्ये बांधून, नायलॉनच्या पिशवीमध्ये बारा लाख रुपये घेऊन ते दुचाकीवर निघाले होते.
नाशिक : बकरा व्यापाऱ्याचा धारदार शस्त्राने खून (Goat Trader Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बकरा खरेदीनंतर शेतकऱ्यांना देण्यासाठी व्यापारी बारा लाख रुपये घेऊन ते निघालेले होते. यावेळी नाशिक जिल्ह्यात (Nashik Crime) निफाड तालुक्यातील देवगाव शिवारातील देवगाव-कानळद रस्त्यावर त्यांची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. अल्लाउद्दीन शमशुभाई खाटीक असे खून झालेल्या बकरा व्यापाऱ्याचे नाव आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील बकरा व्यापारी होते.
काय आहे प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावातील हडेवाडी फाटा पेट्रोल पंपाजवळ राहत असलेले अल्लाउद्दीन शमशुभाई खाटीक हे बकरा व्यापारी गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातून निघाले होते. बकरा खरेदी करण्यासाठी तसेच बकरा खरेदीनंतरची शेतकऱ्यांची रक्कम वाटपासाठी लाल रंगाच्या ओढणीमध्ये बांधून, नायलॉनच्या पिशवीमध्ये बारा लाख रुपये घेऊन ते दुचाकीवर निघाले होते.
नेमकं काय घडलं?
सकाळी सात वाजताच्या सुमारास अल्लाउद्दीन यांची भेट मुलगा तौफीक याच्याशी झाली. तौफिकला त्यांनी निफाड तालुक्यातील सायखेडा येथे बकरा विक्री करण्यासाठी पाठवले. बकरा विक्रीनंतर 10.30 वाजताच्या सुमारास त्याने वडिलांना फोन केला असता त्यांनी तौफीकला घरी जाण्यास सांगितले. यानंतर दुपार झाली तरी अल्लाउद्दीन घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली, मात्र ते नातेवाईकांकडेही गेले नसल्याची माहिती मिळाली.
देवगाव शिवारात मृतदेह
दुपारच्या वेळी निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव शिवारात एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह बकरा व्यापारी असलेले अल्लाउद्दीन यांचा असल्याचं समोर आलं. अल्लाउद्दीन पालथ्या स्थितीमध्ये पडलेले, त्यांचे पाय दोरीने बांधलेले, गळा हा समोरील बाजूने धारदार शस्त्राने कापल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होता.
पैशांसाठी हत्येचा संशय
काही अंतरावर त्यांच्याकडे असलेली मोटर सायकल होती पण या मोटर सायकलला नायलॉनची पिशवी होती, परंतु त्यामध्ये ठेवलेले पैसे नसल्याने कदाचित पैशांसाठी खून झाला असावा असा अंदाज मुलगा तौफीक याने दिलेल्या फिर्यादीवरून व्यक्त केला जात आहे.
पुरावे सापडले, आरोपीचा शोध सुरु
घटनास्थळी नासिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ भेट दिली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीच्या तपासासाठी तीन पथके तयार करत रवाना करण्यात आली आहेत. काही पुरावे आढळून आल्याने लवकरच आरोपीचा शोध लागेल, असे पोलिसांकडून समजते.
संबंधित बातम्या :
बिल्डर संजय बियाणींच्या हत्येने पालकमंत्रीही अस्वस्थ, अशोक चव्हाण बियाणी कुटुंबाच्या भेटीला
उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली