शेतकऱ्यांना उधारी-वसुलीसाठी धमकीचे फोन, कृषी सेवा केंद्राची महिला संचालिका पतीसह पसार
माझा नंबर पोलिसांना दे, तक्रार कर, वकिलाकडे जा, तुला आणि त्याला कोर्टातून उचलतो आणि झोडतो, अशा शब्दात धमकावले जात असल्याने शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे
लासलगाव : द्राक्ष बागेसाठी घेतलेले खत आणि औषधांच्या उधारी-वसुलीसाठी गुंड आणि क्राईम ब्रांचच्या नावाने धमकीचे फोन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील ‘द्राक्षाची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील उगावमध्येच हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे कृषी सेवा केंद्राची महिला संचालिका श्रद्धा सुनील कासुर्डे तक्रार दाखल झाल्यानंतर पतीसह पसार झाली आहे. कृषी मंत्र्यांसोबत असलेले महिलेचे फोटो राजकारणातील तिचे लागेबांधे समोर आणत असून फोटोंवरुन तिच्या दबंगगिरीचीही चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथील विश्वेश्वर कृषी सेवा केंद्रातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेसाठी औषधं आणि खतं उधारीवर घेतली होती. कोरोना काळात द्राक्षांना मागणी नसल्याने अक्षरशः मातीमोल भावाने, किंवा उघड्यावर द्राक्षे फेकून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे प्रपंच कसा चालवावा आणि द्राक्षाची पुढील पिके कशी घ्यावी, या विवंचनेत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विश्वेश्वर कृषी सेवा केंद्राच्या उधारी वसुलीसाठी फोन आले.
फोनवर धमकी
क्राईम ब्रँचमधून बोलतोय असे फोनवर सांगितले जाते, तर उधारी वसुलीची जबाबदारी आमच्या चांगली गॅंगने घेतली आहे. शिवाय माझा नंबर पोलिसांना दे, तक्रार कर, वकिलाकडे जा, तुला आणि त्याला कोर्टातून उचलतो आणि झोडतो, अशा शब्दात धमकावले जात असल्याने निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांना भेटून निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला.
कृषी सेवा केंद्राच्या संचालिका पसार
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून उधारी वसुलीसाठी क्राईम ब्रँच आणि गुंडांच्या नावे फोन करुन धमकवल्या प्रकरणी निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर कृषी सेवा केंद्राच्या संचालिका आणि पती फरार असून पोलीस पथके तयार करुन त्यांचा शोध घेतला जात आहे
द्राक्ष बागेसाठी औषधे आणि खते उधारीवर घेतलेल्या शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या विश्वेश्वर कृषी सेवा केंद्राच्या संचालिका श्रद्धा सुनील कासुर्डे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी मित्र पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार मागे घेण्यात आला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुरस्कार सोहळा उधळून लावण्याचा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे .
धमकीच्या फोनची व्हायरल ऑडिओ क्लीप :
संबंधित बातम्या :
महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, शिवसेना नेते संजय राठोड जबाब नोंदवणार
ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!