तीन लाखांची लाच घेताना नाशकात PSI रंगेहाथ सापडला, कारागृहात रवानगी
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय.पी.एल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी 4 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.
नाशिक : 3 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केलं असता शिंदेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपीएलमधील मॅचवर बेटिंग केल्याप्रकरणी गुन्हा न नोंदवण्यासाठी शिंदेंनी लाच मागितल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय.पी.एल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी 4 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यापैकी तीन लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. महेश शिंदे हे नाशिक ग्रामीण पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सर्रास बेटींग लावली जाते. देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवरही ही बेटींग सुरू होती. याची माहिती पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या हाती लागली. त्यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी बुकीकडे चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, त्यात तोडपाणी होऊन तीन लाख रुपये देण्याचे ठरले. याची कुणकुण लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला लागली. त्यांनी सापळा रचून संजय खराटे याच्याकडून तीन लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदेला रंगेहाथ बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागात बेटींगचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे कारवाईने जोर पकडला, तर याची पाळेमुळे खणणे पोलिसांना सहज शक्य आहे.
महेश शिंदेचे झाले होते निलंबन
महेश शिंदे हा वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. तो हिरावाडी येथे राहतो. त्याने सातपूर येथील निखिल गवळी खून प्रकरणावर संशयितांना मदत केली होती. पोलीस तपासात हे निष्पन्नही झाले होते. त्यामुळे तत्कालीन उपनिरीक्षक कुलवंतकुमार सरंगल यांनीत्याचे निलंबन केले होते. त्यानंतर त्याची उपनगर, मध्यवर्ती गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तिथून त्याने ग्रामीण पोलीस दलात बदलीसाठी जुगाड जमवले. येथील जिल्हा अधीक्षकांकडून गुन्हे शाखेत स्वतःची वर्णी लावून घेतली असल्याची दबक्या आवाजात पोलिस वर्तुळात चर्चा आहे.
पोलिसात खळबळ; प्रतिमा डागाळली
महेश शिंदेला बेड्या ठोकल्याचे कळताच पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या कारवाईने पोलीस दलाची प्रतिमाही डागाळली आहे. शिंदे पूर्वीपासून वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. निलंबन होऊनची त्याची गुन्हे शाखेत वर्णी लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वेगवान तपास केला, तर बेटींगची साखळी उद्धवस्त होऊ शकते.
संबंधित बातम्याः
आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 3 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या
निवृत्त सहकाऱ्याकडे लाचेची मागणी, नाशकात महिला-पुरुष लिपीक जोडगोळी रंगेहाथ जाळ्यात
नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी