चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक : नाशिकमध्ये खासगी बसचा (Nashik Bus accident) भीषण अपघात झालाय. चिंतामणी ट्रॅव्हल्स (Chintamani Travels) कंपनीच्या बसमध्ये अपघातानंतर आग लागली. या आगीत काही प्रवासी होरपळ्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तब्बल 10 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झालाय. अपघात झालेल्या ठिकाणी बचावकार्य करण्यासाठी पोलीस, अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्यात.
यवतमाळच्या पुसदहून खासही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला. ट्रक आणि बस यांच्या धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर बसमध्ये आग लागली. बघता बघता या आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. खासगी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडला.
ही बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची थरारक दृश्यंही समोर आली आहे. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असून नाशिक-औरंगाबाद मार्गावर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये खासगी लक्झरी बसचा जळून कोळसा झाला.
VIDEO : Nashik Private Bus-Truck Accident : नाशकात खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 प्रवासी होरपळल्याची माहिती – tv9#nashik #nashikaccident #bustruckaccident pic.twitter.com/qli1NGy9SK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2022
मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
औरंगाबाद रोडकडून खासगी बस येत होते. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मिरची हॉटेल येथील परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचंही सांगितलं जातं. त्यातच यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसच्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.
काही प्रवासी जिवंत जळत असताना मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला. बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आजूबाजूचा परिसर हादरुन गेला होता. या घटनेनं महाराष्ट्र शहारुन गेलाय. तर जिवंत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्याचंही आव्हान प्रशासनासमोर आहे. अपघातामुळे या बसने प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या नातलगांच्या काळजाचा ठोका चुकलाय.