Nashik Crime | प्रांतअधिकाऱ्याची महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी; प्रशासनाने घडवली चांगलीच अद्दल!
माणूस कितीही मोठ्या पदावर गेला, शिकला-सवरला तरी सुद्धा त्याच्या अंगातले कुरूपपण वारंवार उफाळून येते. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे आला.
नाशिकः माणूस कितीही मोठ्या पदावर गेला, शिकला-सवरला तरी सुद्धा त्याच्या अंगातले कुरूपपण वारंवार उफाळून येते. मग कधी त्याच्या इगोला महिला अधिकाऱ्याचे आदेश खुपू लागतात. तर अनेकदा तो अधिकारी (Officer) असला की, इतर महिला कर्मचारी तरी त्याला कस्पटासमान वाटतात. त्यामुळेच तो अनेकदा त्यांच्यावर नको ते आदेश सोडून ऑफिसमध्ये तर वर्चस्व गाजवतोच. शिवाय अनेकदा अशा महिला कर्मचाऱ्यांकडे चक्क शरीरसुखाची मागणी करायलाही त्याला लाज, वाटत नाही. नेमका असाच संतापजनक प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रांतअधिकारी सोपान कासार याने केल्यामुळे प्रशासनही हादरून गेले आहे.
नेमकी घटना काय?
येवला येथील वर्ग एक पदावर प्रांतअधिकारी म्हणून सोपान कासार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कासार याने गेल्या वर्षी काही कामानिमित्त एका महिला तलाठ्याला घरी बोलावले. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा त्यांनी प्रांतअधिकाऱ्यांवर कारवाई करायची सोडून महिला तलाठ्याचीच बदली करून टाकली. यामुळे प्रशासनात या प्रकरणाची नाना पद्धतीने चर्चा सुरू झाली. शेवटी हे प्रकरण चौकशीसाठी विशाखा समितीकडे सोपवण्यात आले.
चौकशीत काय आले समोर?
विशाखा समितीने तक्रारदार महिला तलाठी आणि प्रांतअधिकारी कासार या दोघांचेही जबाब नोंदवले. इतर साक्षीदारांचे जबाब घेतले. शिवाय दोघांना समोरासमोर बसवून उलट तपासणीही केली. त्यानंतर त्यांना या तक्रारीत तथ्य आढळल्याचे समोर आले. अखेर त्यांनी प्रांतअधिकारी कासावर कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची शिफारस आयुक्तांकडे केली. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत कासा याची वर्धा येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदावर बदली केली.
अनेक तक्रारी दाबल्या
नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागात महिलांच्या लैंगिक आणि मानसिक छळाच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र, त्या दाबल्याची चर्चा सुरूय. एका प्रकरणात एका उपजिल्हाधिकाऱ्याने महिला अधिकाळऱ्याला मध्यरात्री मोबाईलवर मेसेज पाठवल्याचे प्रकरण गाजले होते. तर एका महसूल विभागाच्या प्रमुखाने महिला उपजिल्हाधिकाऱ्याचा छळ केला होता. मात्र, या तक्रारींचे पुढे काहीच झाले नाही. पण यापूर्वी एका प्रांताधिकाऱ्यावर अशीच कारवाई करण्यात आल्याचे समजते.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!