Nashik : वाटेतच लावली वाटाण्यांची विल्हेवाट! कंटेनरमधील 16 लाखाचे वाटाणे गायब करुन चालक फरार
अरुण कुमार यादव यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. आंबे ट्रेडर्स मोहबा यूपी येथून 817 वाटाण्याच्या गोण्या भरलेला एक ट्रक त्यांनी संजय कुमार रामबच्चन या ड्रायव्हरकडे सोपवला होता. त्याला तो ट्रक घेऊन वाशीला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती.
नाशिक : मालवाहतूक कऱणाऱ्या ट्रकमध्ये विचित्र प्रकार घडल्याचं दिसून आलंय. वाटाण्याच्या गोण्या वाहून नेणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरने (Truck driver) चक्क ट्रकमधील गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावून ट्रक मध्येच रस्त्यात सोडला आणि पसार झाला. ही घटना मालेगाव ते घोटी दरम्यान घडली असून संबंधित ट्रक आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) आढळून आलाय. तब्बल 16 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा माल या ट्रकमध्ये होता. एकूण 800 हून अधिक गोण्या असलेल्या या ट्रकमधील वाटाण्याचं नेमकं ड्रायव्हरने केलं तरी काय, असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. याप्रकरणी पोलिसांनी (Ghoti Police) फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसंच आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी ड्रायव्हरचा शोधही घेतला जातोय. हा ट्रक उत्तर प्रदेशहून नवी मुंबईच्या वाशी इथं यायला निघाला होता. मात्र मालेगाव पासून या ट्रकचं लोकेशन ट्रेस होत नसल्यानं मालकाला शंका आली आणि त्यांनी याप्रकरणी पोलीस स्थानक गाठून रितसर तक्रारच दाखल केली.
…आणि जीपीएस बंद केलं!
उत्तरप्रदेशातील मोहबा येथून नवी मुंबईच्या वाशीच्या दिशेने हा ट्रक निघाला. वाशीला पोहोचवण्यासाठी दिलेल्या 817 वाटण्याच्या गोण्यांची कंटेनर ड्रायव्हरने परस्पर विल्हेवाट लावल्यानं एकच खळबळ उडालीय. मुंबई आग्रा महामार्गांवर मालेगाव ते घोटी दरम्यान सदर घटना घडली. संपूर्ण वाटाणा गोण्यांची किंमत तब्बल 16 लाख 48 हजर 843 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलंय. मालेगावमध्ये कंटेनर चालकाने जीपीएस बंद केला.
त्यानंतर रिकामा कंटेनर चालकाने घोटी येथे उभा करून ड्रायव्हर पसार झाला. न्यू गुडविल फास्ट कॅरीयर, या वाशी येथील कंपनीचे मालक अरुण कुमार यादव यांनी घोटी पोलीस ठाण्यात ड्रायव्हरविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार चालकाचा शोध सुरु केला आहे. ऑफिस मधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालकाची ओळख पटवून त्याचा शोध घेतला जातोय. पोलिसांनी कलम 407 नुसार गुन्हाही दाखल केलाय.
तक्रारीत नेमकं काय?
अरुण कुमार यादव यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. आंबे ट्रेडर्स मोहबा यूपी येथून 817 वाटाण्याच्या गोण्या भरलेला एक ट्रक त्यांनी संजय कुमार रामबच्चन या ड्रायव्हरकडे सोपवला होता. त्याला तो ट्रक घेऊन वाशीला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. पण या चालकाने स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर कुठेतरी कंटेनरमधील गोण्याची विल्हेवाट लावली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर जीपीएस बंद करुन घोटी-मालेगावदरम्यान, एका बाजूला कंटेनर चालकाने पार्क केला आणि तिथून पळ काढला, असं तक्रारीत म्हटलंय.
घोटी येथील वैतरणा फाटा येथे रिकामा उभा कंटेनर आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. सध्या याप्रकरणी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांनी आपल्या पथकासह तपास सुरु केला आहे. फरार चालकाचा सध्या शोध घेतला जातोय.