Nashik leopard : दुभत्या गायीच्या 3 वासरांवर हल्ला! बिबट्याने फरफटत नेत पाडला वासरांचा फडशा, गावात घबराट
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रामदास पोपट यंदे यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला चढवला. या हल्ल्यात सदर शेतकऱ्यांच्या दुभत्या गायीच्या 3 वासरांना बिबट्याने अक्षरशः फरफटत नेलं आणि त्यांचा फडशा पाडला.
नाशिक : इगतपुरी (Igatpuri News) तालुक्यात काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आलीय. एका बिबट्याने (Nashik Leopard) भरवस्तीत हल्ला करत तिघा वासरांचा जीव घेतलाय. त्यामुळे गावात दहशत पसरली आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे काही दिवसांपूर्वीच बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं होतं. त्यातच आता नांदुरवैद्य (Nandurvaidya, Igatpuri) येथील शेतकरी रामदास पोपट यंदे यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने वासरांवर हल्ला चढवला. बिबट्याने त्यांच्या दुभत्या गायीच्या तीन वासरांना घरातून ओढलं. बिबट्याच्या हल्लामध्ये तीनही बैल ठार झाले. ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
भरवस्तीत मध्यरात्री थरारक शिकार
बिबट्याने गावातील भरवस्तीत येऊन वासरांवर हल्ला केला. त्यामुळे येथील रहिवाशी भयभीत झालेत. या ठिकाणी बिबट्याच्या दहशतीने नागरिक धास्तावलेत. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा आणि या बिबट्याचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रामदास पोपट यंदे यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला चढवला. या हल्ल्यात सदर शेतकऱ्यांच्या दुभत्या गायीच्या 3 वासरांना बिबट्याने अक्षरशः फरफटत नेलं आणि त्यांचा फडशा पाडला. यामुळे भर वस्तीत बिबट्याची दहशत पसरलीय.
बिबट्याची प्रचंड भीती
भक्ष शोधण्यासाठी आता वस्तीत बिबटे येऊ लागल्याने आणि प्राण्यांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याआधी देखील नांदूरवैद्य येथे गावातील भर वस्तीत जात सदर बिबट्याने गायी, वासरं, बैल, श्वान आदींवर हल्ला करत त्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्यात. यामुळे या वस्तीत बिबट्याची प्रचंड भीती पसरलीय.
दरम्यान, याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष द्यावं. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं. त्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील निवृत्ती यंदे, बापू गायकवाड, ज्ञानेश्वर यंदे, गणेश मुसळे, भगवान गोडसे, रामदास गायकवाड, बाळू यंदे, सचिन काजळे, शिवाजी काजळे, काशिनाथ काजळे ग्रामस्थ करीत आहेत.