Nashik | प्रसिद्ध व्यावसायिकाचं सिनेस्टाईल अपहरण करणाऱ्या आरोपींच्या अटकेचा थरार, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
नाशिक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणी खूप मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
नाशिक | 13 सप्टेंबर 2023 : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाची अखेर उकल करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं 2 सप्टेंबरला त्यांच्या इंदिरानगर येथील राहत्या घराच्या बाहेरुन सिनेस्टाईल अपहरण करण्यात आलं होतं. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी युद्ध पातळीवर तपास सुरु केला होता. एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला असं उघडपणे कुणी अपहरण करुच कसं शकतं? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत.
हेमंत पारख यांचं अपहरण करत आरोपींनी तब्बल 2 कोटींची रक्कम उकळली होती. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे या घटनेचा मास्टरमाईंड महेंद्र बिष्णोई हा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचा नाशिकच्या वाडीवर्हे येथे ढाबा आहे. तर दुसरा मुख्य आरोपी अनिल खराटे हा पारख यांच्या जमिनीच्या रखवालदाराचा मुलगा आहे.
2 महिन्यांपासून अपहरणाचा डाव
आरोपींकडून तब्बल 2 महिन्यांपासून अपहरणाचा डाव सुरू होता. आरोपींनी अपहरणासाठी 7 दिवस रेकी केली होती. त्यानंतर आरोपींनी हेमंत पारख यांना पिस्तूलीचा धाक दाखवत त्यांच्या घरासमोरून बोलेरो पिकअपमधून अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर पैसे मिळताच आरोपींनी गुजरातला पारख यांना सोडून दिलं होतं. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पाच आरोपींना बेड्या
पोलिसांनी 2 कोटी रुपयांतून 1 कोटी 41 लाख रुपये हस्तगत केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण आणि खंडणीची गुन्हा दाखल केला असून त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपी बिष्णोईवर राजस्थानमध्ये अंमली पदार्थाचे 2 गुन्हे दाखल आहेत. आरोपी पिंटूसिंग राजपूतवर 17 गुन्हे, तर आरोपी अनिल खराटे यावर 4 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात 7 आरोपी आहेत, त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
पर राज्यातील आरोपी नाशिकमध्ये येऊन राहतात त्यांची माहिती ठेवण्यासाठी पोलीस आदेश निर्गमित करणार आहेत. 2 कोटींची रक्कम कुणी आणि कधी दिली याबाबत तपास सुरू आहे. अपहरण झाल्यानंतर पारख दुसऱ्या दिवशी नाशकात आले होते. त्यानंतर पारख यांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे घरी गेले होते.
पोलिसांच्या पथकाला 70 हजारांचं बक्षीस
नाशिक पोलिसांच्या दोन पथकांनी या प्रकरणी कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या या कारवाईवर पोलीस आयुक्त खूश झाले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दोन्ही टीमला प्रत्येकी 70 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.