नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : स्वतःच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव रचून पैसे लाटण्याचा डाव स्वतःच्याच जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका संशयित आरोपीला ठरलेल्या रकमेपैकी पैसे कमी दिले गेल्याने त्याने हा संपूर्ण घातपाताचा बनाव मयताच्या भावाला सांगितल्याने हा डाव उघड झाला. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. संशयित 6 आरोपींनी विम्याचे 4 कोटी 10 लाख रुपये लाटले.
सप्टेंबर 2021 मध्ये एका व्यक्तीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर सहा संशयितांनी मयत व्यक्तीच्या विम्याचे तब्बल चार कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केला. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयितांना रात्री उशिरा मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयित बाबूराव सावकार याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पिस्टल आणि 6 काडतूस पोलिसांनी जप्त केली आहेत. विशेष बाब म्हणजे मयत झालेला अशोक भालेराव हा देखील ह्या कटात सामील असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
विमा कंपन्यांकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी या भालेरावने 2019 पासून संशयितांसह सुरू केल्या होत्या. मात्र हा प्लॅन फसत असल्या कारणामुळे संशयितांनी मयत भालेरावचाच काटा काढला आणि अपघाताचा बनाव करून चार कोटी दहा लाख रुपये संशयित बोगस पत्नीच्या अकाउंटवर जमा करुन घेतले. त्यानंतर या संशयितांनी हे पैसे आपसात वाटून घेतले.
मात्र एका संशयिताला पैसे कमी आल्याने या टोळीत वाद झाला. त्यामुळे त्याने मयत अशोक रमेश भालेराव याच्या भावाला हा अपघात नसून घातपात असल्याची कल्पना दिली. त्यांनतर मयताच्या भावाने पोलिसांना तपासाबाबत पत्र दिले.
पोलिसांनी संशयित आरोपी महिला रजनी उके हिला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने इतर सहकाऱ्यांची देखील नावे सांगितली.