मालेगाव : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जीर्ण झालेली सुरक्षा भिंत कोसळून (Wall Collapsed) तीन मुले ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना नाशिकमधील मालेगावमध्ये घडली आहे. तीनही मुलांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीनही मुले 10 ते 12 वयोगटातील आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी (Casualty) झाली नाही. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, मदतकार्य (Relief Work) सुरु केले. राज्यात पावसाचा जोर सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची विशेष गरज आहे.
मालेगाव शहरातील हुसैनिया मशिदीजवळील मोकळ्या जागेवर बांधलेली भिंत आज कोसळली. त्यामुळे येथे खेळणारी तीन निष्पाप मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. हे दृश्य पाहताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आले. स्थानिकांनी आणि अग्निशमन विभागाच्या लोकांनी मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिन्ही मुलांना तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मालेगावात मनपा शाळांची दुरावस्था झाली असून, अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यात राज्यात मान्सूनचा जोर सुरु आहे. पावसामुळे मालेगावातील ईलाईट शाळेची भिंत कोसळल्याची घटना काल रात्री घडली. घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मनपा शाळांची दयनीय अवस्था पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. (Three children were buried under the rubble after a wall collapsed in Malegaon)