नाशिकः प्रजासत्ताक दिनी एक अतिशय धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नाशिक (Nashik) मध्ये महापालिकेच्या (Municipal Corporation) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव असे त्यांचे नाव आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडतो काय, याबद्दल तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.
नेमके काय प्रकरण?
डॉ. सुवर्णा वाझे-जाधव या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज बुधवारी नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
सारे ध्वजारोहणात व्यस्त अन्…
नाशिकमध्ये आज सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. महापालिकेतही हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते. मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह आढळल्याची बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
गुन्हेगारी वाढली
नाशिकमध्ये भयंकर वेगाने गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत तरी एकाच आठवड्यात तीन खून झालेले नाशिककरांनी पाहिले. यात एका राजकीय पदाधिकाऱ्याला संपवण्यात आले. त्याप्रकरणी चांगलेच वातावरण तापले. विविध पक्षांनी आंदोलन केले. मात्र, आता चक्क एका महिला अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने भीतीची वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा. हा घातपाताचा प्रकार आहे की, आणखी काही याचा शोध घ्यावा, असा सूर महापालिका कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना