नाशिकः अतिशय थंड डोक्याने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा (Dr. Suvarna Waje) वाजे खुनप्रकरणात संशयित (suspect) पती संदीपच्या मावसभावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के असे त्याचे नाव आहे. बाळासाहेबविरोधात ठोस पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. मात्र, दुसरीकडे डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड आणि प्रमुख संशयित पती संदीप वाजे (Sandeep Waje) याची चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपलीय. न्यायालयाने त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केलीय. त्यामुळे आता संदीप वाजेचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांनी संदीप वाजेच्या इतर मित्रांचीही कसून चौकशी केलीय. अन्य कोण-कोण या प्रकरणात सहभागी आहेत याचा तपास सुरू केलाय.
तपास भरकटला?
डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणातल्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रमुख संशयित संदीप वाजे हा चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत होता. मात्र, पोलिसांना त्याच्याकडून एकही ठोस पुरावा मिळाला नाही. शिवाय न्यायालयातही पुरावा सादर करायला पोलीस अक्षम ठरले. पोलिसांनी या प्रकरणात एकूण चार ते पाच जण संशयित असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, हे संशयित अजूनही पोलिसांच्या जाळ्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा तपास भरकटला की भरकटवला गेला, असा प्रश्नही उपस्थित होतोय.
वाजे म्हणतो नार्को करा…
पोलिसांना एकही पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे प्रमुख संशयित संदीप वाजे याने मी गुन्हा केला असेल, तर माझी नार्को टेस्ट करा, अशी मागणी न्यायलयात केल्याचे समजते. दुसरीकडे डॉ. सुवर्णा वाजे यांना अतिशय थंड डोक्याने क्रूरपणे संपवले. त्यासाठी नियोजनबद्ध रितीने कट केला. डॉ. सुवर्णा वाजे 25 जानेवारीच्या रात्री काम संपवून क्लिनिकमधून बाहेर पडल्या. त्या मुंबई-आग्रा महामार्ग परिसरालगत पोहचल्या. हे सारे त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून समोर आले. आता पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच दिवशी रात्री डॉ. सुवर्णा वाजे ज्या वेळेस त्या भागात पोहचल्या होत्या, त्यावेळेस संदीपही तेथे असल्याचे समोर येत आहे. संदीपच्या मोबाइलचे लोकेशनही त्यादिवशी मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात आढळले आहे. मात्र, पोलिसांना याचे पुरावे सादर करता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतेय.
दुसऱ्या लग्नावरून भांडण
संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याच्याकडे इतका पैसा नव्हता. यावरून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद विवाद व्हायचे. त्यामुळे त्याने डॉ. सुवर्णा वाजे यांचा काटा काढायचे ठरवले. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला पती संदीपने नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले. त्यांचा खून करून इतर पाच जणांना सोबत घेत पत्नीला जाळले, असा पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे संदीपने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तो रिकव्हर झाला असून, त्यातूनही त्यांच्यात भांडण आणि वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!