सर्वात मोठी बातमी | खबरदार… 50 खोके म्हणत Video शेअर केलात तर… राज्यात पहिला गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची बदनामी भोवली!
पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटासह विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका करत असतांना पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. यावरून संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी या घोषणा लिहिल्या गेल्या, कुणी बैलांवर लिहून जल्लोष केला तर काहींनी फलकबाजी केली. याशिवाय विधानपरिषदेच्या पायऱ्यांवर देखील अनेक आमदारांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या होत्या. याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी हल्लाबोल करत असतांना अनेक एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी त्यावरून पलटवार केला होता. मात्र, घोषणाच इतक्या प्रसिद्ध झाल्या होत्या की काही आमदारांना जाहीर ठिकाणी या घोषणाबाजीला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान मागील आठवड्यातील शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी वाहनातून उतरत असतांना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीतून बाहेर पडत असतांना मोठी गर्दी झाली होती. सुरक्षा यंत्रणेची अक्षरशः दमछाक झाली होती. याच दरम्यान पालकमंत्री दादा भुसे देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. त्यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले होते.
याच वेळेला पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अदखल पात्र गुन्हा आहे.
नांदूरशिंगोटे येथील संदीप चंद्रभान शेळके यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेयर करत बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे शरद शिंदे यांनी वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान यावेळी अशा कुठल्याही घोषणा दिल्या नव्हत्या तरी बदनामीसाठी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हंटले असून शरद कातकडे यांनी याबाबत साक्षीदार म्हणून माहिती दिली आहे. त्यानंतर वावी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक विजय सोनवणे यांच्याकडे याबाबतचा तपास केला जात असून याबाबतचा व्हिडिओ देखील पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता वावी पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.