माझ्या शेतातून मशीन का नेतोय म्हणत दोन शेतकरी कुटुंबात राडा, तुंबळ हाणामारीत जे घडलं ते धक्कादायक होतं, काय घडलं ?
एकीकडे अवकाळी पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू असतांना याच दरम्यान सिन्नर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे गावात एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका अटक केली आहे तर मुख्य संशयित आरोपी फरार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या अवकाळी पाऊसाची स्थिती आहे. त्यामुळे शेतीतील कामे उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग बघायला मिळत आहे. मात्र अशातच माझ्या शेतातून गहू काढण्याचे मशीन का नेतो म्हणून वाद झाला होता. त्यामध्ये मशीन घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली असून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या खंबाळे येथील मारुती बस्तीराम दराडे आणि रामचंद्र नाना दराडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यातील एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
शेतातून मशीन नेल्याचा राग आल्याने संशयित आरोपींनी अंकुश यादव आंधळे याच्याशी वाद घातला होता. त्यामध्ये मारहाण झाल्याने 32 वर्षीय तरुण शेतकरी अंकुश आंधळे गंभीर जखमी झाले होते.
अंकुश आंधळे यांना सुरुवातीला सिन्नर येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर अंकुश यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना नाशिक शहरात उपचारासाठी घेऊन जात असतांना त्यांचा मृत्यू झाला.
अंकुश आंधळे यांनी गहू काढण्यासाठी शेतातून हार्वेस्टर नेले होते. ते का नेले म्हणून दराडे यांनी वाद घातला होता. त्यावरून हा वाद झाला होता. क्षुल्लक कारणावरून झालेला वाद थेट जिवावर बेतल्याने हलहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून हलहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.