त्यांना फक्त निमित्त हवं आहे, काही क्षणातच घर साफ करतात, उपनगरातील घटनेने उडाली खळबळ, CCTV त संशयित कैद…
तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करत असाल किंवा घराला कुलूप लावून गावी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या घरात चोरी होण्याची शक्यता आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात आणि जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील सिन्नर तालुक्यातील आणि शहरातील नाशिकरोड परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडत आहेत. वारंवार घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खरंतर सिन्नर येथील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घरपोडीची घटना घडली होती. लाखो रुपयांचा मुद्देमाल यामध्ये चोरीला गेला होता. त्यानंतर एका माजी सैनिकाच्या घरात असलेल्या पैशांवर डल्ला मारून चोरटे पसार झाले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची मोठी घटना घडली आहे.
उपनगर येथील घरफोडीच्या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरात चोरी करायची होती. त्या घरात काहीही न मिळाल्याने शेजारील दुसरे घर फोडण्यात आले आणि त्यामध्ये चोरट्यांना लाखो रुपयांची दागिने मिळाले आहे.
नाशिकरोड येथील जयभवानी रोड परिसरात रात्री साडे बाराच्या सुमारास घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात व्यक्तींनी कुलूप असलेल्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न केला.
एका फ्लॅटमध्ये या चोरांना काहीच मिळाले नाही. तर दुसऱ्या फ्लॅटमधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरी करणाऱ्या तीन अज्ञात चोरांपैकी एक जण सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
मध्यरात्री घरफोडी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे. घरफोडीमध्ये दागिने लांबविल्यानंतर घरी कोणी नसल्याची माहिती कशी उपलब्ध झाली? याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढत असल्याने शहर पोलिसांच्या आणि ग्रामीण पोलिसांच्या पोलीससिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घर बंद असल्यास घरफोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.