‘तो’ तुमच्या गाडीत बसून प्रवास करेल, तिथेच तुम्ही फसलेला असाल, तुम्हाला कळायच्या आधी तुमचा मोबाईल चोरीला गेलेला असेल…
अलीकडे काही दिवसांमध्ये चोरी करण्यात चोरटे स्मार्ट चोरी करत आहे. गुन्ह्यात आपला सहभाग दिसणार नाही आणि चोरी यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करतात. अशीच एक चोरीची घटना नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिक : अनेकदा गुन्हेगार चोरी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतो. त्यामागील त्याचा हेतु देखील स्पष्ट असतो. गुन्हा करतांना यश यायला हवे आणि गुन्हा ( Crime News ) झाल्यावर आपण त्यामध्ये अडकायला नको. पण पोलिसांनी मनावर घेतलंच तर मग तो कसाही गुन्हा असुद्या गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागतोच. नुकताच एक साधा गुन्हा घडला असून त्याची चर्चा मालेगाव ते नाशिक होऊ लागली आहे. तीन मोबाइल चोरीला ( Mobile Theft ) गेलेले आहे. तुम्ही म्हणाल यामध्ये काय विशेष आहे. तर त्यामध्ये विशेष बाब अशी आहे की, मोबाईल चोरीला गेलेच कसे? असा प्रश्न मालेगाव ते नाशिक प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे गुन्ह्याचा शोध कसा लावायचा असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.
20 ते 22 वर्षाचा एक तरुण मालेगाव येथून तवेरा गाडीतून ओझरच्या एचएल गेटपर्यन्त प्रवास करून आला. त्याच वेळी गाडीत मागील बाजूला मोबाईल दुकानाचे पार्सल ठेवण्यात आले होते. तवेरा गाडीत प्रवासी असल्याने सर्वांचेच बोलणे सुरू होते. अज्ञात चोरटा मागील बाजूला होता.
प्रवासी बोलण्यात गुंतलेले असतांना अज्ञात प्रवाशाने मोबाईल चोरले. आणि नाशिकला थांबा आल्याने तो उतरून गेला. तवेरा गाडीच्या चालकाला प्रवासी भाडेही दिले. मात्र, त्याचवेळी त्याच्याकडे कुठलीही हातात वस्तु नव्हती. विशेष म्हणजे पॅकिंग केलेल्या स्थितीत मोबाईल होते.
दुकानमालकाचे पार्सल द्यायची वेळ आली तेव्हा गाडी चालकाला लक्षात आले की यामधील मोबाइल चोरीला गेले आहे. त्यात शोध घेतला असता कोण कोणते प्रवासी कुठे उतरले. त्यावरून 20 ते 22 वर्षीय तरुणाने हे मोबाईल चोरले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, गाडी प्रवाशांनी पूर्ण भरलेली असतांना 45 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीलाच गेले कसे? चोरी करतांना कुणाला कसे कळले नाही. असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान यापूर्वीही असे प्रवासात मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहे.
त्यामुळे या चोरीचा शोध कसा लावायचा याबाबत पोलिसांनाही प्रश्न पडला असून मोबाईल चोरीची पद्धत आहे तरी कशी याची चर्चा होत आहे. विशाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन ओझर पोलिस ठाण्यात याबाबत चोरीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.