20 लाखांचं लाच प्रकरण, संशयित आरोपीच्या घरात किती घबाड? पाहून धक्काच बसेल…
भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरीच्या कारवाईची धूळ बसत नाही तोच पुन्हा एक मोठी कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
नाशिक : नाशिकमधील लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मार्च महिण्यात मोठ्या प्रमाणात लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयात चर्चेत असतांना नुकतीच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक आणि त्याच्या सहकाऱ्याला तब्बल 20 लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. त्यामध्ये त्यांना न्यायालयात हजर केले असतांना 1 एप्रिल पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडे घरात लाखो रुपयांची रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सिन्नरमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या सिन्नर निबंधक कार्यालयातील सहायक निबंधक रणजीत महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना अटक केली आहे. वाडिलांवरील सावकारी कारवाई टाळण्यासाठी मुलाकडे 20 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
सिन्नर कार्यालयात ह्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये सिन्नर येथील कार्यालयात ही लाच न घेता नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ही लाच घेण्याचे ठरले होते. त्यानुसार गाडीत बसवून तक्रार दाराकडून लाच घेण्यासाठी शहरभर फिरवल्याचे समोर आले आहे.
लाच दिल्यानंतर काही मिनिटांतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे शहरात बुधवारी झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या दोघांच्या घरात पैसे सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिकचा तपास केला जात असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. लाच मागितल्यास थेट 1064 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.