नाशिक : एकीकडे शेतकरी संकटात असतांना दुसरीकडे कृषी अधिकाऱ्याने केलेल्या कृत्याचा संताप व्यक्त केला जात आहे. खरंतर कृषी अधिकाऱ्यांनी शासनाचे दूत म्हणून शेतकऱ्यांना मानसिक बळ देण्याचे गरज असतांना सिन्नर येथील कृषी अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाई नंतर संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. अण्णासाहेब हेमंत गागरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर मात्र शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
लाचखोर अधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे याने कारखानदाराने शेतकऱ्यांना वितरित केलेल्या वस्तूंवर सबसीडी मिळवून देण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेतांना अटक केली आहे.
गागरे यांच्याकडे सिन्नरसह निफाड तालुक्याचा देखील अतिरिक्त परभर आहे. तक्रारदार हा सिन्नर येथील असून त्याचा शेती अवजारे तयार करण्याचा कारखाना आहे. त्याच्याकडून लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाणारी सबसीडी लाटण्याचा हा प्रकार होता. शेतकऱ्यांना दिलेली अवजारे ही पात्र नसून त्याकरिता तुम्हाला चार लाख रुपये द्यावे लागतील त्यानंतर अनुदान मिळेल यासाठी ही लाच मागितली होती.
विशेष म्हणजे हा अधिकारी चार लाखांवरून दोन लाखांवर आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास हजार रुपये देत असतांना ही कारवाई करण्यात आली आहे. गागरे याने दुपारी एक मीटिंग झाल्यावर कार्यालयाच्या बाहेर अचानक निघून गेले होते.
दुपारी ठरलेल्या ठिकाणी लाच घेण्यासाठी गेले असतांना एसीबीने रचलेल्या सापळ्यात कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे अडकला गेला. त्यानंतर कार्यालयात सायंकाळी ही कारवाईची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे शेतकरी अडचणीत असतांना त्यांची मदत करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बांधावर न जाता इकडे लाच घेण्याचा उद्योग केल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला असून लाचखोर कृषी अधिकाऱ्यावर सडकून टीका केली जात आहे.