नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये कोयता गॅंग सक्रिय असल्याचे पाहायला मिळत होते. दहशत निर्माण करण्यासाठी आणि हल्ला करण्यातही अनेक गुन्हेगार कोयता वापरत असल्याने गुन्हेगारीचा एक ट्रेंडच बनला आहे. त्यात आता या कोयता गॅंगचं लोणही शालेय परिसरात होऊ लागले आहे. नुकत्याच नाशिकमध्ये दोन हल्ल्याच्या घटना घडल्याने शालेय वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगारोड परिसरातील आणि म्हसरूळ परिसरातील एका विद्यालयात दोन तरूणांवर टोळक्याने हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये दोन्ही मुलं जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
करण वाळू खांडबहाले हा 19 वर्षीय तरुण गंगापुर रोड येथील महविद्यालयात शिक्षण घेत आहे. कॉलेजच्या बाहेर उभा असतांना काही टोळक्याने त्याला दमबाजी केली. त्यातील एका थेट त्याच्याकडे असलेल्या धारधार शस्राने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला.
या हल्ल्याने कॉलेज परिसरात खळबळ उडाली होती. लागलीच त्याला इतर मुलांनी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या तक्रारीवरुन गंगापुर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे म्हसरूळ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत हल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. शाळेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेने शाळेय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याने शालेय परिसरातील सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत शालेय प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
खरंतर कोयता गॅंग प्रमाणे विद्यार्थीही सर्रासपणे धारधार शस्र घेऊन शालेय परिसरात वावरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात विशेष बाब म्हणजे गुंडासारखे चालणे, गॉगल लावून फिरणे, भाईगिरी करणे असे प्रकार वाढत चालले आहे.