शिंदे बंधूंचा प्रवास ऐकून सारेच थक्क, चोरीच्या पैशात कार घेतली अन् पुढच्याच क्षणी जाळ्यात…
नाशिकच्या होलाराम कॉलनी येथील बहुचर्चित गुन्ह्याची उकल करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. तब्बल पाच महिन्यांनी लाखो रुपये घेऊन फरार झालेले शिंदे बंधु पोलिसांच्या सापळ्यात अडकले आहे.
नाशिक : नाशिकच्या होलाराम कॉलनी येथे मागील वर्षी नोव्हेंबर महिण्यात एक लुटीची घटना घडली होती. या घटनेत तब्बल 66 लाख घेऊन संशयित आरोपी पसार झाले होते. त्यावरून तक्रारदार कन्हैयालाल मनवानी यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शहर पोलिस गुन्ह्याचा तपास करत होते. यामध्ये नुकतीच या बहुचर्चित गुन्ह्याची उकल झाली होती. त्यामध्ये नाशिकच्या सातपुर येथील दोन शिंदे बंधूंना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या बाबी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
खरंतर कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. याच दरम्यान सातपूर येथील युवराज मोहन शिंदे आणि देविदास मोहन शिंदे या शिंदे बंधूंचा ऑर्केस्ट्रा व्यवसायही बंद पडला होता. त्यानंतर ते दुसरीकडे काम धंदा शोधत होते.
त्याच दरम्यान त्यांनी चालकाची नोकरी सुरू केली. त्यामध्ये त्यांना चांगले पैसे मिळत होते. याच दरम्यान त्यातील एकाला कन्हैयालाल मनवानी यांच्याकडे नोकरी मिळाली होती. नोकरी करत असतांना त्याने प्लॅन रचला होता.
कुलकर्णी गार्डन येथून घराच्या दिशेने जात असतांना शिंदे बंधूंनी डोक्याला बंधुक लावून तब्बल पिशवीतील 66 लाख रुपयांना गंडा घातला होता. दोन्ही बंधूंनी मनवाणी याची गाडी आणि 66 लाख रुपये घेऊन पसार झाले होते.
त्यानंतर मनवाणी यांनी पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकिगत सांगितली होती. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाकडून पाच महिन्यांपासून तपास सुरू होता.
या घटनेनेनंतर नाशिक शहरात खरंतर मोठी खळबळ उडाली होती. 66 लाख चोरीची घटना जोरदार चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये दोन्ही शिंदे बंधु हे खरंतर लग्नसराईत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून पैसे कमवत असतांना झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी हा उद्योग केला होता.
चोरी केलेले पैसे घेऊन त्यांनी कोल्हापूर गाठले होते. त्यामध्ये त्यांनी मुंबई पुणे अशा शहरात फिरून मौजमजा केली होती. नातेवाईक आणि घरच्यांशी त्यांनी संपर्क सुद्धा केला नव्हता. त्यामुळे बहुचर्चित असा गुन्हा उघडकीस आल्याने पुन्हा एकदा त्या लुटीची चर्चा होऊ लागली आहे.