नाशिक : अलिकडच्या काही वर्षांमध्ये नैराश्य पचवण्याची क्षमता अनेकांमध्ये राहिलेळी नाहीये. याची प्रचिती वारंवार येत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये ही परिस्थिती अधिक दिसून येत आहे. नाशिक शहरात 22 वर्षीय तरुणाने नुकताच नैराश्यातून जगाचा निरोप घेतला आहे. नुकतीच त्याने एक स्पर्धा परीक्षेचा पहिला पेपर दिला होता. त्यात त्याला तो पेपर अवघड गेल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना आलेला तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचललं आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या 22 वर्षीय शुभम भास्कर महाजन या तरुणाने हे कृत्य केले आहे.
हॉलमध्येच त्याने घरात कुणी नसतांना आपले जीवन संपविले आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे शुभमची बहीण नाशिक शहर पोलिस दलात अंमलदार आहे. शुभमसह आई आणि वडील हे पोलिस वसाहतीत बहिणीसोबत राहत होते.
शुभमने असा अचानक जगाचा निरोप घेतल्याने नातेवाईकांना सुद्धा मोठा धक्का बसला असून संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभमची हुशार मुलगा म्हणून ओळख होती. त्यात त्याने असा निर्णय घेतल्याने नातेवाईकांना अद्यापही विश्वास बसत नाहीये.
अभ्यास करत असतांना त्याला तणाव येत असल्याची बाब त्याने घरात अनेकदा बोलून दाखविली होती. मात्र, त्यानंतर तो इतका टोकाचा निर्णय घेईल असा कुणालाही विश्वास बसत नाही. बाजूलाच असलेल्या महेश कचरे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती कळवली होती.
शुभमचे वडील हे रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. बहीण विवाहित असून त्या इंदिरानगर पोलिस ठाण्यातच अंमलदार आहे. बहीण ज्या वसाहतीमध्ये राहत होते तिथेच शुभम आणि आई वडील राहत होते.
इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या 22 वर्षीय तरुणाने घेतलेला टोकाचा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.