पत्नीचीच नाहीतर त्याने न्यायालयाचीही केली फसवणूक, घटस्फोटासाठी लढवलेली शक्कल पाहून पोलिसही चक्रावले, काय घडलं?
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या तारखेबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेसह वकिलाला दावा निकाली निघल्याची माहिती देण्यात आल्यानं त्यांना धक्का बसला त्यानंतर समोर आली धक्कादायक बाब.
नाशिक : फसवणूक करण्यासाठी कोण कधी कशी शक्कल लढवले याचा काही नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. घटस्फोट घेण्यासाठी एका पतीनं लढवलेली शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात पत्नी आणि न्यायालयाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी न्यायालयातील काही खटले लोक अदालतीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी अनेक तक्रारदार आणि संशयित आरोपींना बोलावण्यात आले होते. त्यामध्ये घटस्फोटाच्या प्रकरणातील एका पतीनं शक्कल लढवली होती. त्यामध्ये त्याने आपली पत्नी न आल्याचे पाहून त्याने तोतया पत्नी उभी करत वकील आणि इतरांच्या सह्या करून घटस्फोट घेतला आहे.
काही दिवसांनी खऱ्या पत्नीला ही बाब समजल्या नंतर तीने वकिलाकडे धाव घेतली. त्यामध्ये वकिलाच्या माध्यमातून संबंधित पत्नीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
द्वारका परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय राहुल दत्तू सानप याचा 2017 मध्ये विवाह झाला होता. 2019 पासून पीडित महिला त्याच्यापासून विभक्त राहत होती. त्यामध्ये त्याने घटस्फोट घेण्यासाठी थेट पत्नीसह न्यायालयाची फसणवुक केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर पीडित महिलेने आणि तिच्या वकिलाने कोर्टात चौकशी केली असता घटस्फोटाचा दावा निकाली निघाल्याचे समोर आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये अनेकांची धूळफेक करत संशयित आरोपी राहुल सानप याचा शोध पोलिस घेत आहे.
यामध्ये कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली त्यामध्ये खोट्या सहया केल्याचे समोर आले असून प्रथम दर्शनी फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आता नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.