नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गोळीबार करत हल्ला केल्याच्या घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर गावठी पिस्तूल गुन्हेगारांना मिळतेच कसे? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी गोळीबार झाल्यानंतर गुन्ह्याचा सखोल तपास करत असतांना गावठी पिस्तूलाची विक्री कुठून आणि कशी होते. याबाबत तपास केला जात असताना नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. यामध्ये नाशिक आणि धुळ्यात पिस्तूल तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोघांना जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.
पिस्तूल तस्करी करणाऱ्या दोघांवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली आहे. दोघांना नाशिकच्या पांडव लेणी आणि फाळके स्मारक येथे दरोडा आणि शस्रविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
दोघेही संशयित हे नाशिकरोड येथील वेगवेगळ्या परिसरातील आहे. जयभवानी रोड येथील अमन राजेंद्र अजय उजैनवाल तर फर्नांडिसवाडी येथील राहुल अजय उजैनवाल असे दोघे संशयित आरोपीचे नाव आहे.
दोन वर्षांपूर्वी या दोघांवर नाशिक पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर ते पांडवलेणी परिसरात असल्याची माहिती नाशिकच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ते त्या ठिकाणी का गेले असावे याचाही शोध घेतला.
राहुल आणि अमन हे दोघे पिस्तूल विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक केली. त्यामध्ये दोघांच्या अंगझडतीत दोन पिस्तूल आढळून आले आहे.
पोलिसांच्या तपासात नाशिक आणि धुळे परिसरात पिस्तूल विक्रीची तस्करी करत असल्याची त्यांनी कबुली दिली असून आणखी मोठे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागून आहे.