मुलगा सापडला नाही म्हणून आईवर हल्ला, पंचवटीतील ‘त्या’ प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा, गोळीबारात वापरलेले पिस्तूलही…
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात झालेला गोळीबार आणि त्यानंतर समोर आलेल्या हल्ल्याने घबराट निर्माण झाली होती. याच बहुचर्चित गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या फुलेनगर येथे एकावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी बंदुकीचा वापर करून गोळीबार देखील करण्यात आला होता. यामध्ये एका महिलेच्या अंगाला बंदुकीतून निघालेली गोळी चाटून गेल्याने त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला की नाही अशी चर्चा सुरू होती. अशातच नाशिक शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे काही अंशी नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. या घटनेने खरंतर पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पंचवटी येथील फुलेनगर परिसरात मुंजा बाबा चौक येथे प्रेम महाळे हा तरुण उभा असतांना अचानक तिथे संशयित आरोपी विशाल भालेराव आणि त्याचे काही साथीदार आले होते. त्यांनी शिवीगाळ करत प्रेम वर हल्ला करण्यात सुरुवात केली होती.
यामध्ये संशयित आरोपी विशाल भालेरावसह विकी वाघ, संदीप अहिरे, जय खरात यांनी त्याच्यावर धार धार शस्राने हल्ला करतांना प्रेम ने आपल्या घराच्या दिशेने पळ काढला होता. यावेळी प्रेम पुढे धावत असतांना त्याच्या मागे सगळे धावत होते.
प्रेम पुढे जोरजोरात धावत असतांना संशयितांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. यावेळी प्रेम वरील निशाणा हुकला होता पण प्रेमची आई यावेळेला मध्ये धावून आल्यानं त्यांच्या अंगाला गोळी चाटून गेली होती. त्यात त्या जखमी झाल्या होत्या.
महिला जखमी झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तीन पथके तयार करून तपास केला जात होता. त्यावेळी पोलिसांना संशयित शहरातच लपून असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर मखमलाबाद येथे लपून बसलेल्या काही संशयित आरोपींना अटक केली असून अंगझडतीत एक गावठी पिस्तूल देखील मिळून आले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.