अपघातानंतर आता पंचनामा करणारे पोलिस असतील फिर्यादी, नाशिक पोलिस आयुक्तांचा निर्णय, काय आहे कारण?
नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे अपघात झाल्यावर मृत किंवा नातेवाईक व्यक्ति हे माहिती न देऊ शकल्याने त्यांच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : अपघात घडल्यानंतर बहुतांश वेळेला गुन्हा दाखल होत नाही. त्याचं कारण म्हणजे अपघातात मृत्यू झालेला व्यक्ति तक्रार देऊ शकत नाही. याशिवाय नातेवाईक अनेकदा तक्रार देत नाही. याशिवाय तक्रारी उशिरा प्राप्त झाल्यानं बऱ्याचदा तपास उशिरा होतो आणि गुन्ह्याचा शोध लागत नाही. त्यामुळे अपघात आणि त्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि त्यानंतर तपासात काहीही निष्पन्न न होण्याचे प्रमाण बघून नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तक्रारदार हा पंचनामा करणारा पोलिसच असणार आहे. ज्या ठिकाणी तक्रार घेणं शक्य आहे. त्याठिकाणी तक्रार घेणे अन्यथा पंचनामा करणारा पोलिस कर्मचारीच आता फिर्यादी होणार आहे.
अपघातग्रस्त आणि अपघातात झाल्यानंतर अनेकदा नातेवाईक किंवा प्रथमदर्शनी व्यक्ति फिर्याद देत नाही. त्यामुळे फिर्याद नसल्याने गुन्हा दाखल होत नाही आणि त्याचा तपासही पूर्ण होत नाही. त्यामुळे आता पंचनामा करणारा पोलिस अधिकारी किंवा कर्मचारीच फिर्यादी होणार आहे.
नाशिक शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही भूमिका घेतली आहे. अपघातांचा गुन्हा दाखल करण्यासाठी एकतर फिर्यादीच कोणी नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तपासी अधिकारी याला न्याय मिळून देण्यासाठीचा मार्ग अधिक सोपा होत आहे.
खरंतर अपघातग्रस्त व्यक्ती किंवा ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता मदत होणार असल्याने पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जाणार आहे. यामध्ये हवालदार ते पोलिस उपनिरीक्षक पदाचे अधिकारी फिर्याद देऊ शकणार आहे.
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे फिर्यादी वेळेवर उपलब्ध नसल्याने गुन्हा सिद्ध करण्यास अडचण निर्माण होते. मृत झालेली व्यक्ती आणि नातेवाईक यांना घटना कशी घडली याबाबत माहिती नसते. ही बाब आता दूर होणार असून पंचनामा करणारे कर्मचारीच फिर्यादी बनणार आहे.