शहरातील पान टपरीवर QR कोड लावा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी; काय आहे कारण?
नाशिक शहरातील गुन्हेगारी वाढत असतांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून पोलिस आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये पत्राद्वारे मोठी मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : नाशिक शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून पोलिस प्रशासनाकडे केली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी पान टपरीवर क्यू आर कोड लावा अशी मागणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचा सतत वावर असणाऱ्या पानटपऱ्या आणि चाय टपऱ्यांवर पोलिसांनी क्यूआर कोड लावून गस्त ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक शहरात दिवसाढवळ्या हत्या, दरोडा, गोळीबार, चोरी असे गंभीर गुन्हे घडत असल्यानं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा क्यू आर कोड असेल आणि तो वेळोवेळी पोलिसांनी गस्तीच्या वेळी स्कॅन केला तरी गुन्हेगारांवर वचक बसेल अशी मागणी करण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणे, गुन्हे घडण्याच्या संभाव्य जागा, तसेच शहरातील गुन्हेगारी परिसरात अधिक प्रभावीपणे गस्त व्हावी म्हणून गस्तीवरील पोलिसांकरिता क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू करावी असे पत्रात म्हंटले आहे.
पेट्रोलिंग दरम्यान कुठलाही संवेदनशील भाग सुटता कामा नये याकरिता हा पर्याय शहरात प्रभावीपणे राबविला जात होता. परंतु नंतरच्या काळात पोलिस आयुक्त बदलून गेल्यानंतर ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. दरम्यान परराज्यातील टोळ्या गुन्हे करून जात असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.
तडीपार करण्यात आलेले गुंड देखील नाशिक शहरात वास्तव्यास आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा देखील अनेक गुन्ह्यात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे शहरात भर दिवसा गुन्हे करण्याची मजल गुन्हेगारांची जाऊ लागली आहे. बहुतांश गुंड अथवा भुरटे चोर हे पान टपरी आणि चहा टपऱ्या येथे व्यसनाकरिता येतात.
पान टपरी आणि चहा टपऱ्यांवर गुन्हेगार इतर सहकाऱ्यांसोबत मिळून गुन्ह्याची रूपरेषा आखत असतात. अनेक गुन्ह्यांसंदर्भात दोषी असलेले गुन्हेगार देखील याठिकाणी दिसून येऊ शकतात. त्यामुळे शहरातील पान टपऱ्या आणि चहा टपऱ्या येथे क्यूआर कोड लावल्यास पोलिसांना मोठी मदत होईल असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पोलिसांना पत्राद्वारे सुचविले आहे.