नाशिक : आमिषाला बळी पडल्यास फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते आणि तशी अनेक प्रकरणे समोर आली आहे. त्यातून नागरिकांनी धडा घेणं अपेक्षित असते. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आमिषाला बळी पडून स्वतःची लाखों रुपयांची फसवणूक करतात असे अनेक प्रकार समोर आले आहे. असाच एक प्रकार नाशिक मध्ये उघडकीस आला आहे. विम्यासाठी हप्त्याने जे पैसे भरलेय ते परत मिळवून देतो आणि फ्लॅटची तुम्हाला लॉटरी लागली आहे. फ्लॅट नको असेल तर त्याचे पैसे मिळतील असे आमिष दाखवून तब्बल 81 लाख रुपयांना नाशिकमध्ये एका वृद्धाला गंडा घालण्यात आला आहे. फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात देविदास मुळे या वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरुन अंकितकुमार सक्सेना व राधाकृष्णन पिल्लई या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार 2011 ते 2023 दरम्यान घडला आहे.
दोघा भामटयानी यामध्ये वृद्धाला तब्बल 81 लाखांना फसविले आहे. यामध्ये कराच्या फाइल्स आणि कर भरण्यासाठी तब्बल 24 खात्यांवर पैसे घेतले आहे. यामध्ये 13 बँकेचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये विविध बहाणे देऊन ही फसवणूक केली आहे.
वारंवार पैसे देऊनही भरलेले पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आले आणि त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
मागील आठवड्यात असे इन्शुरन्सचे पैसे परत मिळवून देतो म्हणून लाखों रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळीची तक्रारदार यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एकूणच वृद्ध नागरिकांना यामध्ये फसवणूक करण्यासाठी लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आणि या घटनाही काही वर्षांनी उजेडात येत असल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.