मशिदीजवळच थाटला होता कत्तलखाना, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, कारवाईने जिल्हाभरात खळबळ
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मशिदीजवळच हा अवैध प्रकार सुरू असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईने संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कत्तलखान्यावर अचानक कारवाई करण्यात आल्यानं उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. खरंतर ओझर येथील अकबरी मशिदीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. कत्तलखान्यावर ओझर पोलिसांनी छापा टाकून गोवंश जनावरांचे मांससह सात लाख 68 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तब्बल नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे कारवाई होण्याची माहिती आधीच मिळाल्याने संशयितांनी पळ काढला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ओझर येथे कत्तलखाना असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पोलिस त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अचानक नाशिकच्या ओझर पोलिसांनी कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या ओझर पोलिसांनी 1500 किलोहून अधिक गोवंश जनवारांचे मांस, कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. जाऊद्दीन कुरेशी यांच्या शेडमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
या कारवाईत धक्कादायक बाबी समोर आल्या असून जुबेर कुरेशी, इजाज कुरेशी, ईस्तीयाक कुरेशी, अन्वर कुरेशी, सलीम कुरेशी, नदीम कुरेशी, अल्तमस कुरेशी, शाहरुख कुरेशी आणि शेडचा मालक जाऊद्दीन कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात अशा अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानं ओझर शहरात खळबळ उडाली आहे. कठोर कारवाईची मागणी केली जात असून पोलिस संशयित आरोपींच्या शोधत आहे.
यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कत्तलखाना सुरू असल्याची बाब माहिती असतांना पोलिसांना याबाबत माहिती नव्हती का? की पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून कत्तलखाना सुरू ठेवला जात होता यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.