रस्त्याने जातांना मोबाइल खिशात होता,अचानक गायब झाला, चोरट्याचाच डाव तो, पोलिसांनी कसा उधळला पाहा…
अनेकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळणार नाही, असाच काहीसा अनेकांचा समज असतो पण तो समज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी दूर केला आहे.
नाशिक : अनेकदा एखादी गोष्ट चोरीला गेली तर ती परत मिळेल याची काही शाश्वती नसते. अनेकदा पोलिसांना चोरी उघडकीस आणण्यात अपयश येत असतं. शक्यतोवर अनेकजण चोरीला गेलेली वस्तू परत मिळणार नाही असाच समज करून बसतात. पण असा समज ठेऊ नका. चाणाक्ष असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांनी हा समज दूर केला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली होती. त्यामध्ये दुचाकी वरुन जाणाऱ्या व्यक्तीच्या खिशातून दोघा संशयतांनी दुचाकीवरून येत अलगद मोबाईल काढून घेत पलायन केले होते. त्यावेळी तक्रारदार यांनी आरडाओरड केली पण तोपर्यंत दोघे संशयित निघून गेले होते. त्यामुळे मोबाइल गेला अशी काहीशी धारणा तक्रारदार व्यक्तिची झाली होती.
दिंडोरी तालुक्यातील संजय संतू शार्दूल कामाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले होते. त्याच दरम्यान त्यांनी आपला महागडा मोबाइल आपल्या वरच्या खिशात ठेवलेला होता. त्याचवेळी आलेल्या उदय सुनील चारोस्कर आणि अंकुश अरुण गायकवाड यांनी तो मोबाइल अलगद काढून धूम ठोकली.
मोबाइल घेऊन दोघे संशयित पळत असतांना संजय शार्दूल यांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पलायन करून चोरी करण्यात यशस्वी झाले होते. मात्र, ही चोरी त्यांना काही फार काळ पचली नाही. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्याच हे चोर असल्याचे लक्षात आले.
तक्रारदाराच्या लक्षातही आले नव्हते, तोपर्यन्त पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. लागलीच दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी पकडले. काही मिनिटांत घडलेला हा प्रकार ऐकून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जवळपास 25 हजार रुपयांच्या मोबाईल वर डल्ला मारला होता. मात्र, काही मिनिटांत ही चोरी पंचवटी पोलिसांनी पकडली. त्यामुळे या चोरीच्या घटनेची उकल काही क्षणात झाल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पोलिसांच्या कामगिरीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.