देवावरच डल्ला मारायला आला होता, पण ‘तिसरा डोळा’ उघडला अन् चोराची पळता भुई थोडी झाली
नाशिकच्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात मूर्तीच्या गळ्यातील सोन्याची पॉलिश असलेले दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून सुरक्षा रक्षकावर चोराने हल्ला चढविला आहे.
नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आलेल्या नाशिकच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी झाली आहे. रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती असलेल्या मंदिरात ही चोरी झाली आहे. खरंतर नाशिक शहरात चोरीच्या घटना वाढत असतांना दागिने चोरी करण्याची मजल थेट मंदिरात येऊन ठेपली आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळणे, घरफोडी करणे अशा घटना घडत असतांना पहाटेच्या वेळेला चांदीच्या गणपती असलेल्या मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. यातील विशेष बाब म्हणजे सुरक्षारक्षकाने चोराला रोखल्याने त्याने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने गंगाधर हाके जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
खरंतर उन्हाळा सुरू की झाला की चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. यामध्ये पहाटेच्या वेळेला झालेल्या या चोरीच्या घटनेत गणपती बाप्पाच्या गळ्यातील सोन्याची पॉलिश असलेले दागिने चोराने लांबविले होते.
चोराने चोरी करत असतांनाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये चोरी करून चोराने पळ काढला होता. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती समजताच सतर्क असलेल्या पोलिसांनी चोरांचा पाठलाग सुरू केला होता.
चोर हे गोदावरी नदीच्या दिशेने पळाले होते. त्याच दरम्यान पोलिस आपला पाठलाग करत आहे असे लक्षात आल्याने चोराची पळता भुई थोडी झाली होती. यामध्ये थेट चोरानी पाण्यात उडी मारली होती.
रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात चोरी, सुरक्षा रक्षकावर हल्ला pic.twitter.com/JtlfnCYIqd
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 17, 2023
गंगावाडी परीसरात चोर पळ काढत असतांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी निहाल यादव नावाच्या चोराला ताब्यात घेतले आहे. हा मूळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून पोलिस अधिकचा तपास करीत आहे.
खरंतर या चोरीच्या घटनेनंतर मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. या घटणेची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.