आरडाओरड झाली म्हणून घराच्या बाहेर पडला, आणि त्याला हीच चूक नडली; शहरानंतर ग्रामीण भागातही धाड धाड गोळीबार
गोळीबाराच्या सलग दोन घटना नाशिकमध्ये घडल्याने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही घटनेतील संशयित आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित असतांना शहरात ऐन उन्हाळ्यात दिवाळीचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे सातपुर औद्योगिक वसाहतीत कार्बन नाका येथे गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. त्यामध्ये तरुण जखमी असून त्याचे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नसतांना नाशिकच्या ग्रामीण भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, दोन्ही गोळीबराच्या घटना काही अंतरावर घडल्याने नाशिकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडीवऱ्हे येथे मध्यरात्रीच्या वेळी घराच्या बाहेर जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागल्याने समाधान अशोक अहिरे हे घराच्या बाहेर आले. त्याचवेळी संशयित आरोपी अनिल सातपुते, वसंत मगर, आनंद शिंदे यांच्यासह काही तरुण अहिरे यांना दिसले.
त्याचवेळेला अहिरे यांच्यासोबत संशयित आरोपी यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अहिरे यांच्यासोबत त्यावेळेला एक जण सोबत होता. बाचाबाची सुरू असतांना शिवीगाळ झाली आणि संशयित आरोपी अनिल याने कमरेला असलेली बंदूक बाहेर काढली.
बंदूक बाहेर काढताच समाधान अहिरे आणि त्यांचा सहकारी यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन वेळेस अहिरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये समाधान अहिरे यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत माहिती दिली आणि गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर धरपकड मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अद्याप संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
नाशिक शहर हद्दीत आणि शहर हद्दीलाच लागून असलेल्या ग्रामीण हद्दीत गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही ठिकाणचे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीये. अशातच गोळीबाराच्या वाढत्या घटना बघता शहरात दिवाळी सुरू झालीय का ? अशी टीका दबक्या आवाजात होऊ लागली आहे.