नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जादूटोणासारखे प्रकार घडत असल्याची दुर्दैवी बाब वारंवार समोर येत आहे. यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे झाडांवर बाहुल्या आणि लिंबू मिरच्या लावण्यासाठी खिळे ठोकले जात असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. याच बाबतीत अंधश्रद्धा निर्मूलत समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींवर ठोस कारवाई होत नसल्याने या घटना बंद होत नसल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा झाडांवर काळ्या बाहुल्या, लिंबू आणि मिरच्या आणि पैसे झाडांना खिळयांच्या सहाय्याने ठोकण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. त्यामध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडी परिसरात आलेल्या झाडांना जादूटोणा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही चिठ्ठ्या ही बांधण्यात आल्या आहे.
जादूटोणा करण्यासाठी झाडांना खिळे ठोकले जातात. लिंबू, मिरच्या, बाहुल्या आणि फोटो यांसह काही मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. खरंतर वारंवार या घटना समोर येत असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिकरोड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करत झाडांवर जादूटोण्यासाठी लावण्यात आलेल्या वस्तु उतरवल्या जाव्यात यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
यामध्ये पोलिसांनी याबाबत चौकशी करून कठोर कारवाईची देखील मागणी केली आहे. यामध्ये झाडांना इजा पोहचत असल्याने तात्काळ बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या, खिळे काढण्यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे असे निवेदन देण्यात आले आहे.
अमावस्याच्या दिवशी काही जादूटोणा करणारे व्यक्ती हे काळ्या बाहुल्या, लिंबू, नारळ, उडीद, बिबा, मिरच्या, कोहळा या वस्तु घेऊन जात आघोरी पूजा करत असतात. हेच बाबा बुवा पकडून पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी केली जात आहे. यामध्ये अंनिसचे कार्यकर्ते संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहे.