केंद्रीय मंत्र्यांच्या मतदार संघात संतती नियमनासाठी आलेल्या आदिवासी महिलांसोबत धक्कादायक प्रकार
म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या प्रकाराची तक्रार आदिवासी महिला रुग्णांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे. स्थानिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, बहिऱ्या झालेल्या प्रशासनाच्या कानावर यातले काहीही पडत नाही. आता तर अधिकाऱ्यांनी डोळेही मिटून घेतलेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे.
नाशिकः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आदिवासी महिला (tribal women) मजुरांसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार गावकऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांकडे केली. मात्र, त्यांनी तिला केराची टोपली दाखवली. जर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात अशी परिस्थिती असेल, तर दुसरीकडे काय, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. आदिवासी महिलांचा होणारा हा छळ थांबवा. आम्हाला न्याय द्या, अशी आर्त विनवणी गावकरी करतायत. मात्र, मुक्या आणि बहिऱ्या प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहचताना दिसत नाहीय.
नेमके प्रकरण काय?
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये ऊस आणि द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या शेतीच्या कामांसाठी पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर या ठिकाणी येतात. असेच काही मजूर अलिबाग येथून निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे आले आहेत. यातील पाच महिला मुजरांनी म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संतती नियमनाची शस्त्रक्रिया केली. मात्र, या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्यावेळी दारूच्या नशेत महिला कक्षेत दाखल होऊन त्यांचा अक्षरशः छळ सुरू केलाय.
तर्र होऊन येतो अन्
दारूच्या नशेत तर्र होऊन हा कर्मचारी महिलांच्या कक्षात येतो. संततीची शस्त्रक्रिया केलेल्या महिलांसोबत असलेल्या महिलांसह लहान मुलांना बाहेर काढत अरेरावी करतो. तेथीलच एक आरोग्य सेविका उर्वरित तीन महिलांनी संतती नियमनाची शस्त्रक्रिया आपल्या गावी गेल्यावर करावी. आता शस्त्रक्रियेसाठी येथे येऊ नये, असा अजब सल्ला देत आहे. या रुग्णांना जेवण, पाणीही मिळत नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला कक्षेच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा आणि ग्लासचा अक्षरशः खच पडला आहे.
तक्रार केली, पण…
म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या प्रकाराची तक्रार महिला रुग्णांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे. स्थानिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, बहिऱ्या झालेल्या प्रशासनाच्या कानावर यातले काहीही पडत नाही. आता तर अधिकाऱ्यांनी डोळेही मिटून घेतलेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात असे सुरू असेल, तर इतर ठिकाणी काय, असा सवाल विचारला जात आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!