बस स्थानकात पार्टी रंगली होती, अचानक एकाच्या डोक्यात तिडीक गेली आणि समोर आली धक्कादायक बाब
नाशिकच्या वणी बस स्थानकात रात्रीच्या वेळी नाशिक शहरातील एका युवकाची हत्या झाल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गुन्ह्याची उकल केली आहे.
नाशिक : काही तासांपूर्वी असलेल्या कट्टर दोस्तीचे रूपांतर शत्रुत झाल्याची एक घटना नाशिकमध्ये ( Nashik Crime News ) उघडकीस आली आहे. या घटनेने नाशिक शहरासह ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. मित्रानेच मित्राला क्षुल्लक कारणावरून संपविल्याची घटना समोर आली आहे. खरंतर नाशिक शहरातील एका तरुणाचा ग्रामीण भागातील वणी हद्दीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी ( Nashik Rural Police ) अवघ्या सहा तासांत या घटनेची उकल केली असून त्यानंतर पोलिस तपासात मित्रानेच मित्राला संपविल्याची बाब समोर आली आहे. बस स्थानक परिसरात दारू पार्टी सुरू असतांना अचानक दारू पिण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. आणि हत्येची घटना घडली.
विनोद ऊर्फ रॉक मधुकर मोरे या युवकाचा दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बसस्थानकात हत्या झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आणि सहा तासांत संशयित आरोपींना अटक केली आहे.
मयत विनोद मोरे नाशिकच्या पाथर्डी शिवारात राहायला आहे. मित्रांसोबत विनोद वणीला गेला होता. रात्री मित्रांसोबत पार्टी केली. हीच पार्टी वणी बसस्थानकात सुरू होती. त्यामध्ये त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला आणि हत्या केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.
विनोदला मित्रांनीच दगडाने ठेचून मारले आहे. त्यानंतर सकाळच्या वेळेला दगड घातलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या गुणहयची उकल केली आहे.
या प्रकरणी एकाला गुन्हे शाखेने तर दोघांना वणी पोलिसांनी गजाआड केले असून अधिकचा तपास केला जात आहे. यामध्ये छोटू ऊर्फ हरीश काळुराम प्रजापती, दीपक गायकवाड, मतीन आयास काझी यांना अटक करण्यात आली आहे.
विनोदच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा वणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या सहा तासांत खुनाच्या घटनेची उकल केल्याने त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलिसांनी कौतुक केले आहे.