वर्षभरापूर्वी गुन्हा केला, नंतर नेपाळमध्ये जाऊन लपला.. पोलिसांनी ‘त्याला’ बेड्या कशा ठोकल्या ?
वर्षभरापासून हुलकावणी देणाऱ्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात वर्षभरानंतर का होईना पोलिसांना यश मिळाले. पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कधी ना कधी पकडला जातोच. एखाद्या छोट्याश्या चुकीमुळे, सुगाव्यामुळे त्याचा पत्ता लागतोच. अशीच एक घटना नवी मुंबईतही (navi mumbai crime) घडली आहे. मूळच्या फरिबादमधल्या असलेल्या एका इसमाने वर्षभरापूर्वी एक गुन्हा केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला आणि थेट नेपाळमध्ये जाऊन लपला. पोलिस त्याचा कसून शोध घेतच होते. अखेर वर्षभराने त्याला बेड्या ठोकत गजाआड (finally arrested) करण्यात आले. कुंदन कुमार गिरी (21) असे आरोपीचे नाव आहे.
न्यू पनवेलमधील सुखापूर येथील फॅब्रिकेशन व्यावसायिकाचा खून करून गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या हरियाणातील फरिदाबाद येथील एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली. आरोपी त्याच इसमाच्या दुकानात कामाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी नेपाळला पळून गेला आणि तेथे बराच काळ लपून बसला.
पोलिस त्याचा बऱ्याच काळापासून शोध घेत होते. अखेर कुंदन हा आरोपी फरीदाबादमध्ये लपल्याची खबर तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना मिळाली. त्या मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत गिरी याला अटक केली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पैशांवरून वाद झाला आणि घडला गुन्हा
आरोपी गिरी हा मूळचा फरिदाबाद येथील रहिवासी आहे. तो नवी मुंबईत एका फॅब्रिकेशन दुकानात कामाला होता. रियाझुद्दीन हबीब शेख ( वय 58) हे त्याच्या दुकानाच्या मालकाचे नाव. मात्र कुंदन याला वेळच्यावेळी पगार मिळत नव्हता. ऑक्टोबर 2022 याच मुद्यावरून कुंदन आणि दुकानाचे मालक शेख यांच्यात वाद झाला. आणि रागाच्या भरात कुंदनने शेख यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने थेट वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मात्र,या हत्येनंतर कुंदन फरार झाला आणि नेपाळमध्ये जाऊन लपला. पोलिस वर्षभर त्याचा तपास करत होते. अखेर तांत्रिक तपास करून त्याचा शोध घेण्यात आला आणि पोलिसांनी फरिदाबादमधून कुदंनला अटक केली. तेथे तो कामासाठी गेला होता, तेव्हाच पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या.