Navi mumbai Crime : माणुसकीला काळिमा ! आधी मारहाण, नंतर अंगावर थेट कुत्राच.. कार पार्किंगच्या वादातून अमानुष कृत्य
क्षुल्लक कारणावरून झालेला हा वाद भलताच पेटला. त्यानंतर पिता-पुत्राने केलेल्या या कृत्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच हादरले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले.
नवी मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : कार पार्किंग हा सध्याचा मोठा मुद्दा आहे. रस्त्यावर वाहनं जास्त आणि पार्किंगसाठी जागा कमी असं चित्र सध्या सर्वत्र दिसतं. सोसायटीमध्येही पार्किंगसाठी जागा असली तरी सगळीच वाहनं काही तिथे पार्क होऊ शकत नाही . अशा वेळी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या इमारतीच्या, गेटच्या समोर काही वेळासाठी गाड्या पार्क केल्या जातात. मात्र याच पार्किंगच्या मुद्यावरून अनेकवेळा वाद होतात. क्षुल्लक मुद्यावरून लोकं हमरीतुमरीवर येतात , ज्याचं मोठ्या भांडणात रुपांतर होऊ शकतं. अशाच एका भांडणातून नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला.
सोसायटीच्या गेटवर काही वेळासाठी उभी केलेली कार काढण्याचा वाद बघता बघता पेटला. त्याच मुद्यावरून पिता-पुत्राच्या एका जोडीने दुसऱ्या व्यक्तीला जबर मारहाण केली. मात्र ते एवढ्यावरचं थांबले नाहीत, त्यापुढे त्यांनी जे कृत्य केलं ते पाहून सगळेच हादरले. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शहरातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
आधी मारहाण केली नंतर थेट अंगावर कुत्राच सोडला…
नवी मुंबईतील नेरूळ येथे ही घटना घडली. नेरूळमधील सेक्टर-१९ ए येथील लेण्याद्री सोसायटीत हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठल राक्षे या इसमाने या सोसायटीच्या गेटसमोर काही वेळासाठी त्याची कार उभी केली होती. मात्र याच सोसायटीत राहणारे मुळगावकर कुटुंबातील पिता-पुत्रांना ही गोष्ट पटली नाही.
ती कार तेथून काढण्याचा मुद्यावरून मुळगावकर पिता-पुत्राने कारचालक विठ्ठल राक्षे याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. हळूहळू तो वाद पेटला आणि त्याचे भांडणातच रुपांतर झाले. काही वेळाने मुळगावकर पिता-पुत्र हे हिंसकच झाले आणि त्यांनी विठ्ठल राक्षे याला बेदम मारहा करण्यास सुरूवात केली. दोघांच्याही मारापासून वाचण्यासाठी विठ्ठल हा आटोकाट प्रयत्न करत होता. मात्र त्या दोघांनी त्याला मारणं सुरूच ठेवलं.
ते एवढ्यावरचं थांबले नाहीत, त्यापुढच्या कृत्याने सर्व हादरले. मुळगावकर यांच्याकडे असलेल्या पाळीव कुत्र्याला त्यांनी विठ्ठल याच्या अंगावर सोडले. कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करत , चावत त्याला गंभीर जखमी केले.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. या घटनेची तक्रार नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी मुळगावकर पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. नेरूळ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी तात्काळ गुन्हा दाखल करत अमानुष मारहाण करणाऱ्या पिता-पुत्रावर कारवाई केली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.