Navi Mumbai Crime : इस्टेट एजंट बनून आली अन् घराच्या नावाखाली लुटून गेली… कोट्यवधींची फसवणूक करून महिला फरार
नवी मुंबई पोलिसांनी एका ४२ वर्षीय महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रिअल इस्टेट एजंट असल्याचे भासवून तिने सहाजणांना घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडून काही पैसेही घेतले आणि ती फरार झाली. कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या महिलेला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. त्यासाठी कठोर मेहनत करून, पै-पै जमवला जातो. मनासारखं घर मिळेपर्यंत अनेक ठिकाणी भटकंतीही केली जाते. एवढं करून अखेरीस मनासारखं, बजेटमध्ये बसणारं आपल्या हक्काचं, स्वप्नातलं घरं (buying home) मिळतं. तो आनंद अवर्णनीयच ! पण याच स्वप्नाचा भंग करून कोणी लुटलं तर ? विचारही नकोस वाटतो ना. पण असं खरंच घडलं आहे. लोकांना घर मिळवून देण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या एका भामट्या महिलेविरोधात (fraud) पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नवी मुंबई पोलिसांनी एका ४२ वर्षीय महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रिअल इस्टेट एजंट असल्याचा दावा करून घर खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या सहा लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. तिने त्यांची एकूण १.८७ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तिला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
घर मिळवून देण्याचे दिले आश्वासन
आपण एका रिअल इस्टेट डेव्हलपरची एजंट असल्याचा दावा त्या महिलेने केला होता. नवी मुंबई येथील उरण भागातील जासई येथे घर मिळवून देऊ असे आश्वासन आरोपी महिलेने तक्रारदास इसमांना दिले. जानेवारी 2023 पासून ती त्यांच्याकडून पैसे घेत होती असे उरण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र आश्वासन दिल्यानंतर काही काळ उलटून गेल्यानंतरही घराचे पझेशन न मिळाल्याने लोकांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी तातडीने त्या महिला इस्टेट एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. तिने त्यांच्या कॉलला उत्तरच दिले नाही. त्यानंतर आरोपी महिला जासई सोडून फरार झाल्याचेही त्यांना कळले आणि मोठा धक्का बसला.
आरोपी पैसे घेऊन फरार झाल्याने तक्रादारांची अवस्था बिकट झाली. त्यांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा कुठेच पत्ता लागेना. अखेर हवालदील होऊन पीडित नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांसमोर आपबिती कथन केली. सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांचे पथक स्थापन करून तिचा कसून शोध घेण्यासही सुरूवात केली. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे. मात्र आयुष्यभर मेहनत करून जमा केलेले पैसे असे लुटले गेल्याने तक्रारदास हवालदील झाले असून आरोपी महिलेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.